HSC Board Exam: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत ‘कॉपीमुक्त अभियाना’चा फज्जा उडवणाऱ्यांविरोधात बोर्डाने मोठी कारवाई केली आहे. परीक्षेदरम्यान झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्यभरातील ३४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच २७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडसे यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे. राज्यात १०९ कॉपी प्रकरणे उघड – बारावीच्या परीक्षेत कालपर्यंत राज्यभरात एकूण १०९ कॉपीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यात सर्वाधिक प्रकरणे अमरावती विभागात समोर आली असून तेथे ५० गुन्हे दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त पुणे विभागात २७, नागपूरमध्ये ११, लातूरमध्ये ११, छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ आणि नाशिकमध्ये ४ ठिकाणी कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे बोर्डाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वाशीममध्ये २६ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड – वाशीम जिल्ह्यातील ‘श्री मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडा’ येथे भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरवेळी सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. राज्य मंडळाने आणि जिल्हा दक्षता समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत या केंद्रावरील २६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले असून या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये छतावरून दगडफेक पद्धतीने कॉपी – बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी पुरवण्याचा एक अजब प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चक्क दगडाला कॉपी बांधून ती खिडकीतून वर्गात फेकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी कॉपीमुक्त अभियान राबवल्याचा आणि प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा दावा केला होता, मात्र या घटनेने प्रशासनाच्या दाव्यातील फोलपणा उघड केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि ३१ केंद्रे बंद – कॉपीमुक्त अभियानांतर्गत बोर्डाने सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. सुमारे ३३ हजार शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना ई-मेल, एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच संवेदनशील १९१ केंद्रांवर जनजागृती करण्यासाठी मान्यवरांचे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दरम्यान, गैरप्रकार आढळल्यामुळे राज्यातील ३१ परीक्षा केंद्रे कायमची बंद करण्यात आली असून ५५४ केंद्रांवर अद्याप सीसीटीव्ही सुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे.