ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा कसा होता जीवनप्रवास; जाणून घ्या

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने टाटांनी देशातच नव्हे तर जगभरात छाप सोडली होती.
कसा होता रतन टाटा यांचा जीवनप्रवास ?
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1936 रोजी मुंबईत झाला. टाटा 10 वर्षांचे असताना, 1948 मध्ये त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. आजी नवजबाई टाटा यांनीच टाटांना दत्तक घेतले. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईत झाले. पुढे बिशप कॉटन स्कूल, शिमला, नंतर कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
रतन टाटा यांनी अमेरिकेतील दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये भांडी घासण्यापासून ते लिपिकपदाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. यादरम्यान रतन टाटा यांची कामाविषयीची प्रामाणिकता आणि धडपड पाहून जेआरडी यांनी रतन टाटांना टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टीलमधून आपल्या उद्योग जगतातील कारकीर्दीला सुरुवात केली.
प्रचंड मेहनताच्या जोरावर टाटांनी समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम काम केले. 1990 ते 2012 या काळात त्यांनी समूहाचे अध्यक्षपद भूषवले तसेच ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते.आज घडीला टाटा ग्रुपच्या ८० देशांत १०० कंपन्या आहेत आणि त्यामध्ये सव्वाचार लाख कर्मचारी आहेत.





