Rajya Sabha elections: १६ मार्च रोजी दहा राज्यांच्या विधानसभा राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान करणार आहेत. यावेळी सर्वाधिक चर्चा आहे ती जेडीयू नेते नितीशकुमार यांची. त्यांनी २१ वर्षांच्या बिहार मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा धक्कादायक निर्णय घेत राज्यसभेत जाण्याचे ठरवले आहे. बिहारमधून भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन हेही प्रमुख उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया आणि मतमोजणीची पद्धत समजून घेणे महत्त्वाचे आहे. राज्यसभा सदस्य कसे निवडले जातात? लोकसभा निवडणुकीत १८ वर्षांवरील नागरिक थेट मतदान करतात, मात्र राज्यसभेत मतदान करण्याचा अधिकार फक्त राज्य विधानसभेच्या सदस्यांना असतो. हे मतदान एकल हस्तांतरणीय मताद्वारे (सिंगल ट्रान्सफरेबल व्होट) पद्धतीने होते. दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे राज्यसभा सदस्य तेथील आमदारांच्या मतदारसंघाद्वारे निवडले जातात. अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली, दमण-दीव, चंदीगड आणि लडाख यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. जम्मू-काश्मीरला मात्र प्रतिनिधित्व आहे. राज्यसभेत एकूण २५० सदस्य असतात, त्यापैकी १२ जणांची नियुक्ती साहित्य, विज्ञान, कला किंवा समाजसेवेतील विशेष ज्ञानाच्या आधारे राष्ट्रपती करतात. उर्वरित सदस्य निवडणुकीद्वारे येतात. राज्यसभा सदस्य होण्यासाठी पात्रता काय? राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वय ३० वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवार ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, त्या राज्याच्या कोणत्याही संसदीय मतदारसंघात त्याची मतदार म्हणून नोंदणी असणे बंधनकारक आहे. राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो आणि दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. राज्यसभा हे स्थायी सभागृह असल्याने ते कधीही विसर्जित होत नाही. निवडणूक प्रक्रिया कशी सुरू होते? राज्यसभेतील रिक्त जागा भरण्यासाठी राष्ट्रपती निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करतात. संबंधित राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांना मतदान करण्यास सांगितले जाते. निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मतदानाचे ठिकाण निश्चित करतो आणि आवश्यक मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो. हेही वाचा: व्यापाऱ्याचा एक धाडसी निर्णय आणि दोन ‘क्लास-1’ अधिकारी गजाआड; 20 लाखांच्या पहिल्या हप्त्याने उडवली झोप! उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मते लागतात? हे संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण आमदार संख्येवर अवलंबून असते. जिंकण्यासाठी लागणारा कोटा एका सूत्राने काढला जातो… एकूण मतदान करणारे आमदार भागिले (रिक्त जागा + १), आणि त्यात १ मिळवायचे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात 288 आमदार मतदान करत आहेत आणि 7 जागांसाठी निवडणूक आहे, तर 288 भागिले 8 म्हणजे 36, आणि 36 अधिक 1 म्हणजे 37 हा विजयाचा कोटा ठरतो. 37 मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित होतो. एकल हस्तांतरणीय मत पद्धत कशी काम करते? राज्यसभा निवडणुकीत आमदार उमेदवारांना पहिली, दुसरी, तिसरी अशा प्राधान्यक्रमाने मते देतात. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मते मिळतात तो विजयी ठरतो. जर एखाद्या विजयी उमेदवाराला 41 मते मिळाली, तर त्याची ४ अतिरिक्त मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारांकडे हस्तांतरित होतात. एकापेक्षा जास्त विजयी उमेदवारांकडे अतिरिक्त मते असल्यास सर्वाधिक अतिरिक्त मते असलेल्या उमेदवाराची मते आधी हस्तांतरित होतात. तरीही जागा रिक्त राहिल्यास सर्वात कमी पहिल्या पसंतीची मते मिळालेला उमेदवार बाद होतो आणि त्याच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीची मते इतरांकडे जातात. सर्व जागा भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. पक्ष रणनीती कशी आखतात? प्रत्येक पक्ष प्रथम विजयाचा कोटा आणि स्वतःच्या आमदारांची संख्या मोजतो. उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाकडे १०० आमदार आणि कोटा ४१ असेल, तर ८२ आमदारांद्वारे दोन उमेदवारांचा विजय निश्चित केला जातो. उर्वरित १८ आमदारांच्या मतांवर तिसरा उमेदवार उभा केला जातो, ज्यासाठी अपक्ष किंवा छोट्या पक्षांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. क्रॉस-व्होटिंग रोखण्यासाठी २००३ पासून खुल्या मतपत्रिकेची (ओपन बॅलेट) पद्धत सुरू आहे. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखवावी लागते. न दाखवल्यास मत अवैध ठरते. त्यामुळे क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या आमदाराला पक्षकारवाईचा धोका असतो. अपक्ष आमदारांना मात्र कुणालाही मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक 2026 — उमेदवार व मतांचे गणित महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागा एप्रिलमध्ये रिक्त होणार आहेत. दोन आमदारांच्या निधनामुळे विधानसभेची प्रभावी संख्या २८६ झाली असून विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला ३७ मते आवश्यक आहेत. महायुतीचे उमेदवार (६ जागा): भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने ज्योती वाघमारे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. मविआचा एक उमेदवार: काँग्रेसकडे १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (उद्धव) २० असे मविआचे एकत्रित संख्याबळ एक उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे आहे. महायुतीचे संख्याबळ: भाजपकडे १३१, शिंदे शिवसेनेकडे ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. २३०हून अधिक आमदारांसह महायुती आघाडी सहाही उमेदवार निवडून आणण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, ७ पैकी ६ जागा महायुती तर १ जागा मविआ जिंकण्याची शक्यता आहे. क्रॉस-व्होटिंग न झाल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.