1 लाख 20 हजार रुपयात घरकुल बांधायचं कसं? अनुदानातून विटा अन् वाळूदेखील येईना…

योगेश गांगर्डे
कर्जत – करोनानंतर सावरणार्या सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकापाठोपाठ एक असे धक्के बसत आहेत. इंधन व जीवनावश्यक वस्तूबरोबर सिमेंट, विटा, लोखंडाचे दर वाढल्याने या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही वर्षात सिमेंट, विटा, वाळू आणि लोखंड या बांधकाम साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत घरकुलाचे अनुदान मात्र जैसे थे च आहे. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम पूर्ण करताना सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक फरफट होताना दिसत आहे.
इंधनाच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला. त्यामुळे बांधकाम साहित्य महागले असल्याचे सांगितले आले.उत्पादक कंपन्यांकडून होत असलेली ही दरवाढ घरकुल लाभार्थ्यांना जबर फटका देणारी ठरत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सिमेंटच्या एका गोणीचे भाव 300 रुपयांदरम्यान होते. आता हेच दर 340 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
गतवर्षी ऑगस्टमध्ये लोखंडाचे दर प्रति किलो 38 ते 46 रुपयांदरम्यान होते. आता हेच दर 56 ते 58 रुपयांपर्यंत झेपावले आहेत.विटांचे दर देखील 7500 रुपयांपर्यंत पोहोचली. बांधकाम साहित्याचे दरात दुपटीने वाढले आहे, असे असतानाही शासनाकडून घरकुल बांधकामासाठी मात्र केवळ 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते.
यातून विटा व वाळूदेखील येत नसल्याने बांधकाम पूर्ण कसे करावे, हा आर्थिक पेच लाभार्थींसमोर निर्माण झाला आहे. सन 2021-22 मध्ये 2 हजार 321 घरकुले आणि त्यापूर्वीची अपूर्ण असलेली 3 हजार 269 अशा एकूण साडे पाच हजार घरकुल लाभार्थींना या दरवाढीचा फटका बसला आहे.




