वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमांडेंचा थेट सवाल

Bhalchandra Nemande – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी पुन्हा एकदा आपले परखड मत व्यक्त केले आहे. रामायण अनेक प्रकारची आहेत. तेव्हा केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. त्याच बरोबर राम काय खात होते असे बोलणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला.
जळगाव शहरातील जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
भालचंद्र नेमाडे म्हणाले, राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे वाचूनच लक्षात येते. त्यामुळे टीव्ही, भाषण या माध्यमातून सत्य कळणार नाही किंवा त्यावर कशासाठी चर्चा करायची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बरं एकच रामायण आहे का? वेगवेगळ्या लिखित रामायणामध्ये राम सुद्धा वेगवेगळा आहे. कंबोडियातला राम वेगळा आहे, जैन रामायणातला राम वेगळा आहे. अशा पद्धतीने अनेक युगांमधून बदलून वाल्मिकीच्या काळातील रामायण आपण वाचतो. केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
लेखकांनी सत्य कसे शोधले पाहिजे यासाठी त्यांनी प्रभू राम आणि रामायणाचे उदाहरण दिले. राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? साहित्यिकाने खोलात जाऊन ते शोधले पाहिजे.
त्याच पद्धतीने एकच रामायण नाही, वेगवेगळ्या लिखित रामायणमध्ये सुद्धा राम हा वेगळा होता. ‘थ्री हंड्रेड’ रामायण नावाचे पुस्तक रामार्जून यांनी लिहिले त्यात राम हा वेगळा होता. ते पुस्तक बंद पाडले अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.





