रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी स्टारलिंक ही सेटेलाइट आधारित इंटरनेट सेवा भारतात उपलब्ध करण्यासाठी इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्ससोबत करार केला आहे. या भागीदारीमुळे देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये स्वस्त हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांमध्ये स्टारलिंकचे 50 लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. आता लवकरच भारतात देखील ही सेवा सुरू होणार आहे. जिओ, एअरटेलने स्पेसएक्ससोबत केलेल्या कराराचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील स्वागत केले आहे. जिओ, एअरटेल- स्टारलिंकचा करार नक्की काय? रिलायन्स जिओ आपल्या नेटवर्क आणि रिटेल स्टोअर्सद्वारे स्टारलिंकचे उपकरण आणि सेवांचे वितरण करणार आहे. तर भारती एअरटेल देखील या स्टारलिकंच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याद्वारे प्रामुख्याने पारंपरिक ब्रॉडबँड आणि मोबाइल नेटवर्क पोहोचत नाही, तिथे उपग्रह इंटरनेटमुळे लोकांना जलद आणि स्थिर इंटरनेट मिळू शकेल. मात्र, भारत सरकारकडून परवानगी मिळण्याआधीच जिओ आणि एअरटेलने याबाबत स्पेसएक्सशी करार केल्याने याची चर्चा रंगली आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर, देशभरात स्टारलिंकची सेवा उपलब्ध होईल. एकूणच, या करारामुळे भारतातील इंटरनेट क्रांतीला गती मिळेल. तसेच, डिजिटल इंडिया मोहिमेचाही विस्तार होईल. स्टारलिंक नक्की काय आहे? ‘स्टारलिंक’ ही स्पेसएक्स कंपनीची उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा आहे. पारंपरिक इंटरनेट सेवा फायबर केबल्स किंवा मोबाइल टॉवर्सवर अवलंबून असते, पण स्टारलिंक थेट अंतराळात उपग्रहांशी जोडले जाते. ‘लो अर्थ ऑर्बिट’ उपग्रहांद्वारे थेट ग्राहकांपर्यंत इंटरनेट पोहोचवले जाते. स्टारलिंक सेवेच्या माध्यमातून थेट अंतराळातील उपग्रहांद्वारे इंटरनेट उपलब्ध होत असल्याने जिथे सामान्यपणे इंटरनेट पोहोचत नाही, अशा भागातही जलद आणि स्थिर इंटरनेट मिळू शकते. प्रामुख्याने भारतातील दुर्गम आणि गावांमध्ये ही सेवा उपयोगी ठरेल. स्टारलिंकच्या माध्यमातून 50 Mbps ते 250 Mbps स्पीडने इंटरनेट वापरता येईल. त्यामुळे व्हीडिओ कॉल, ऑनलाइन गेमिंग आणि स्ट्रीमिंगसाठी या सुविधेचा फायदा होईल. या अंतर्गत ग्राहकाला एक खास किट मिळते, ज्यात डिश अँटेना आणि राऊटर असतो. हा अँटेना थेट उपग्रहांशी जोडला जातो आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होते. त्यामुळे टॉवर उभारण्याचीही गरज पडत नाही. थोडक्यात, इतर अतिरिक्त खर्च वाचतो. सध्या ही सेवा 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सुरू आहे आणि लवकरच आणखी विस्तार होणार आहे. स्टारलिंक सेवा भारतात सुरू झाल्यास काय फायदा होईल? भारतात स्टारलिंक सेवा सुरू झाल्यास याचे अनेक फायदे पाहायला मिळू शकतात. यामुळे देशातील डिजिटल क्रांतीला मोठी चालना मिळेल. सध्या टेलिकॉम कंपन्यांद्वारे शहरी भागात 5जी सेवा उपलब्ध करण्यात आली असली तरीही ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सुविधा मर्यादित आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने लोक शिक्षण, आरोग्य, शेती आणि व्यवसायाच्या डिजिटल सेवांपासून वंचित राहतात. स्टारलिंकच्या उपग्रह-आधारित इंटरनेटमुळे ग्रामीण व दुर्गम भागातही जलद आणि स्थिर इंटरनेट सेवा मिळू शकते. यामुळे सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला मोठा फायदा होईल आणि देशभरातील लोकांना विविध ऑनलाइन सेवांचा अधिक चांगला लाभ घेता येईल. शिक्षण क्षेत्रात सरकारच्या DIKSHA आणि SWAYAM यांसारख्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा फायदा ग्रामीण विद्यार्थ्यांना घेता येईल. तसेच, ऑनलाइन माध्यमातून आरोग्य सेवा देखील लवकरच पोहचवता येईल. PM-KISAN, e-NAM सारख्या अनेक सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचू शकतील. इंटरनेटच्या अभावामुळे अनेक ठिकाणी लोक ऑनलाइन बँकिंग, UPI पेमेंट आणि इतर सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत. स्टारलिंकमुळे ही समस्या दूर होईल. थोडक्यात, भारताच्या डिजिटल विकासाला वेग मिळेल. भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवेची किंमत किती असेल? सध्या अमेरिकेत स्टारलिंक इंटरनेट सेवेसाठी दरमहिन्याला जवळपास 120 डॉलर खर्च करावे लागतात. प्लॅननुसार, या किंमतीत वाढ होते. भारतात या सेवेची किंमत 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून ही सेवा कधीपर्यंत उपलब्ध होईल व याची किंमत किती असेल याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारत हा जगातील सर्वाधिक इंटरनेट यूजर्स असणाऱ्या दैशांपैकी एक आहे. सध्या देशात 95 कोटींपेक्षा अधिक लोक इंटरनेट वापरतात, परंतु तरीही देशातील लाखो लोक अद्याप इंटरनेटच्या सुविधेपासून वंचित आहेत. जिओने 2016 मध्ये स्वस्त इंटरनेट उपलब्ध करून डिजिटल क्रांती घडवली होती. त्यामुळे स्पेसएक्सची स्टारलिंक सेवा भारतात सुरू झाल्यास इंटरनेट क्षेत्रात आणखी मोठा बदल घडू शकतो.