BCCI Announce Prize Money : बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला जाहीर केलं बक्षीस! प्रत्येक सदस्याला मिळणार तब्बल ‘इतके’ पैसे

BCCI announces Rs 58 crore prize money for Indian team : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाला २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. आता बीसीसीआयनेही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल भारतीय संघासाठी ५८ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोणाला किती पैसे मिळतील? ते जाणून घेऊया.
भारतीय संघातील प्रत्येक सदस्याला मिळणार ३ कोटी रुपये –
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. त्यापैकी, भारतीय संघातील प्रत्येक सदस्य आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी प्रत्येकी ३ कोटी रुपये मिळतील. तर उर्वरित सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी ५० लाख रुपये मिळतील.
🚨 NEWS 🚨
BCCI Announces Cash Prize for India's victorious ICC Champions Trophy 2025 contingent.
Details 🔽 #TeamIndia | #ChampionsTrophy https://t.co/si5V9RFFgX
— BCCI (@BCCI) March 20, 2025
या ३ खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळला नाही –
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात ऋषभ पंत, अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु या खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी कोणत्याही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे या तिघांना संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसावे लागले. आता या खेळाडूंनाही चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद जिंकल्याबद्दल प्रत्येकी ३ कोटी रुपये मिळतील.
कर्णधार रोहितने एकाही सामन्यात जिंकली नाही नाणेफेक –
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच सामने खेळले आणि ते सर्व जिंकले. या पाचही सामन्यांमध्ये कर्णधार रोहितने नाणेफेक गमावली. भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका हंगामात सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक गमावणारा आणि नंतर विजेतेपद जिंकणारा पहिला संघ बनला. यापूर्वी कोणत्याही संघाला हे करता आले नव्हते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.





