रशियाकडून तेल खरेदी करून भारताला नेमका किती फायदा झाला? जाणून घ्या

नवी दिल्ली – भारताने रशियाकडून स्वस्त खनिज तेल खरेदी करून बराच लाभ करून घेतला असल्याचा आरोप केला जात आहे. काही संस्थांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताला यामुळे 10 ते 25 अब्ज डॉलरचा फायदा झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये भारताला या स्वस्त तेल खरेदीतून केवळ 2.5 अब्ज डॉलरचा लाभ झाला असल्याची माहिती एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आली आहे.
सीएलएसएया ब्रोकरेज संस्थेने या संदर्भात ही माहिती जारी केली आहे. या संस्थेने म्हटले आहे, की प्रत्यक्षात 2.5 अब्ज डॉलरचा लाभ झाला आहे. ही रक्कम भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 0.6 टक्के इतकी आहे.
रशिया -युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी भारत आपल्या एकूण गरजेच्या केवळ एक टक्के खनिज तेल रशियाकडून खरेदी करत होता. युद्ध सुरू झाल्यानंतर हे प्रमाण वाढून काही काळ 40% पर्यंत गेले होते, हे खरे आहे. मात्र रशिया भारताला जेवढा डिस्काउंट देतो असे दावे केले जात आहेत तेवढा डिस्काउंट भारताला मिळत नाही. यामुळे नफ्याचे आकडे फुगवून सांगितले जात असल्याचे दिसून येते.
बर्याच युरोपियन देशांनी रशियाकडून खनिज तेल खरेदी बंद केली असली तरी नैसर्गिक वायूची खरदी चालूच ठेवली होती. यामुळे रशियाकडे अतिरिक्त खनिज तेल उपलब्ध होते. भारताने त्यावेळी योग्य दरावर हे तेल खरेदी केले आहे. मात्र ट्रम्प प्रशासनाने भारताने या आयातीतून नफेखोरी केला असल्याचा आरोप वेळोवेळी केला आहे.
भारताने हे खनिज तेल खरेदी करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केलेला नाही. मुळात अमेरिकेने किंवा युरोपने रशियन खनिज तेल किंवा या खनिज तेलापासून तयार केलेले पदार्थ खरेदी करण्यास बंदी घातलेली नव्हती. उलट याच देशांनी भारताने तयार केलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे आयात केली असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले.
तर खनिज तेल महाग झाले असते –
जागतिक खनिज तेलाच्या किमती वाढू नयेत म्हणून अमेरिकेच्या तत्कालीन प्रशासनानेच भारताला खनिज तेल खरेदी करण्याची सूचना केली होती असे बोलले जाते. मात्र याला दुजोरा मिळालेला नाही. जर भारताने रशियाचे खनिज तेल खरेदी केले नसते तर भारताला पर्यायी स्त्रोतातून खनिज तेल खरेदी करावे लागले असते.
अशा अवस्थेत जागतिक खनिज तेल बाजारात खनिज तेलाच्या किमती 100 डॉलरपेक्षा जास्त झाल्या असत्या. याचा फक्त भारतीय अर्थव्यवस्थेवरच नाही तर जगातील इतर खनिज तेल आयात करणार्या देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला असता असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताने याच कालावधीत सौदी अरेबिया, इराक आणि अमेरिकेकडूनही खनिज तेल खरेदी केले आहे.





