एक्‍झिट पोल किती खरा किती खोटा?

मतदानोत्तर जनमत चाचण्यांचा अंदाज हा निवडणुकीचा साधारण रोख स्पष्ट करणारा असतो हे जरी खरे असले तरी प्रत्येक वेळी तो खराच असतो असे मात्र नाही असे याआधीच्या काहीं चाचण्यांमधून दिसून आले आहे. सन 2014, आणि 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या एक्‍झिट पोलच्या चाचण्या बहुतांशी वस्तुस्थिती निदर्शक ठरल्या होत्या.पण सन 2004 साली झालेल्या एक्‍झिट पोलच्या चाचण्या मात्र सपशेल अपयशी ठरलेल्या दिसून आल्या.

सन 2004 साली देशातील चार प्रमुख संस्थांनी ज्या चाचण्या घेतल्या होत्या त्याच्या एकत्रित सरासरीनुसार तत्कालिन अटलबिहारी वाजपेयी सरकारच पुन्हा देशात सरकार स्थापन करील असे संकेत मिळाले होते पण प्रत्यक्षात मात्र युपीए आघाडी सत्तेवर आलेली दिसून आली होती. त्यावेळी चार एक्‍झिट पोल चाचण्यांनी भाजप प्रणित एनडीएला 255 आणि कॉंग्रेस प्रणित युपीएला 183 जागा मिळतील असे भाकीत वर्तवले होते. पण प्रत्यक्षात एनडीएला 187 आणि युपीएला 219 जागा मिळाल्या होत्या.

मात्र त्याचवेळी सन 2014 च्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला जेवढ्या जागा दर्शवण्यात आल्या होत्या त्यापेक्षा कितीतरी अधिक जागा घेत एनडीए सत्तेवर आली होती व युपीएला केवळ 55 जागा मिळून त्यांचा साफ धुव्वा उडाला होता. त्या एक्‍झिट पोल मध्ये युपीएला किमान 100 जागा मिळतील असा सर्वसाधारण अंदाज वर्तवण्यात आला होता पण त्यांना केवळ 55 जागा मिळाल्या होत्या. आणि एनडीएला 289 जागा अपेक्षित धरण्यात आल्या होत्या, त्यांना प्रत्यक्षात 336 जागा मिळाल्या.

सन 2015 साली झालेल्या दिल्ली व बिहार विधानसभांच्या निवडणुकांच्या निकालांनीही एक्‍झिट पोलच्या चाचण्यांना पुर्ण हुलकावणी दिली होती. त्यामुळे यंदाच्या एक्‍झिट पोल मध्ये एनडीएला बहुमत मिळेल असे भाकीत करण्यात आले असले तरी भाजप समर्थकांना प्रत्यक्ष निकालाची उत्सुकता असेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.