नवी दिल्ली – अदानी समूहातील कंपन्यांनी सरलेल्या आर्थिक वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या वर्षांमध्ये या समूहातील कंपन्यांचा करपुर्व नफा वाढून 90 हजार कोटी रुपये इतका झाला आहे. अदानी समूहाकडे सध्या शिल्लक रक्कम 21 महिन्याची कर्जफेड करण्यासाठी पुरेशी असल्याचेही या कंपनीने स्पष्ट केले आहे. सरलेल्या सहा वर्षांमध्ये या कंपनीच्या नफ्यात जवळजवळ तिपटीने वाढ झाली असल्याचे या कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीचा करपुर्व नफा 24,870 कोटी रुपये होता. तो 2024 -25 मध्ये वाढून 90 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. वार्षिक पातळीवर या कंपनीच्या करपूर्व नफ्यात 8.2% वाढ झाली आहे. तर गेल्या सहा वर्षात दर वर्षाला हा नफा 24 टक्क्यांनी वाढला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या सहा वर्षात निव्वळ नफा दरवर्षी 48 टक्क्यांनी वाढला असून 2024 -25 मध्ये या कंपनीचा निव्वळ नफा 40,585 कोटी रुपये झाला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीची ढोबळ मालमत्ता या सहा वर्षात दरवर्षी 22 टक्क्यांनी वाढून 6,09,133 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. या काळात कंपनीवरील कर्ज वाढून 2.9 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. कंपनीचा ताळेबंद उत्तम असून आगामी दहा वर्षांमध्ये कंपनी विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. दोन वर्षांपूर्वी कंपनीवर आरोप झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र दरम्यानच्या काळामध्ये या कंपनीने आपल्यावरील आरोपाचा इन्कार केला आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात वेगाने वाढ होत असून आता कंपनीचे शेअर पूर्व पदावर आले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.