पिंपरी, – शहरातील तीनही मतदारसंघात आज मतमोजणी होणार आहे. कोणत्या उमेदवाराला किती मते पडतील? याचे आडाखे मतदानापूर्वीपासून बांधले जात असले तरी उमेदवारांसमोर डिपॉजिट वाचविणे हे सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे. शहराचा आजवरचा इतिहास पाहता केवळ भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत दोनहून अधिक उमेदवारांना डिपॉजिट वाचविता आले होते. यंदा किती उमेदवार आपले डिपॉजिट वाचवू शकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच यावेळी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत किमान सव्वा लाखाहून अधिक मते घ्यावीच लागतील तर पिंपरी इतर उमेदवारांनी जरी भरपूर मते मिळवली तरी विजयी होण्यासाठी उमेदवारास किमान 70 ते 80 हजार मतांची गरज पडणार आहे. चिंचवडमधील उमेदवारांना हवीत इतकी मते सर्वाधिक उमेदवार हे चिंचवड मतदारसंघात आहेत. चिंचवडच्या रिंगणात एकूण 21 उमेदवार आहेत. चिंचवडचा इतिहास पाहता आजवर केवळ पहिले दोन उमेदवार वगळता इतर उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहेत. यंदा या मतदारसंघात 3 लाख 87 हजार 520 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याचा अर्थ की डिपॉजिट वाचविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराला किमान 64328 हून अधिक मते मिळवावी लागतील. पिंपरी विधानसभा मतदारसंघ शहरातील सर्वांत लहान मतदारसंघात नेहमीच विधानसभा निवडणूक चुरशीची होते. परंतु 2014 सालची निवडणूक वगळता कधीच दोन पेक्षा अधिक उमेदवारांना डिपॉजिट वाचविता आले नाही. 2014 साली या मतदारसंघात तिरंगी लढत पहावयास मिळाली होती. 2014 साली युती आघाडी मोडली होती. यामुळे मते विभागली गेली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार 28.88 टक्के मते घेऊन विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे 27.56 टक्के मतदान घेऊन दुसर्या क्रमांकावर होते. तर भाजपनी ही जागा आरपीआयला सोडल्याने आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे 26.73 टक्के मते घेऊन तिसर्या क्रमांकावर होत्या. यंदा या मतदारसंघातील 2, 02,766 मतदारांनी केले आहे. डिपॉजिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किमान 33,659 मतांची आवश्यकता आहे. यंदा भोसरीत डिपॉजिट वाचविणे अवघड भोसरी विधानसभा मतदारसंघात यंदा अतिशय चुरशीची लढत झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट मुकाबला असून मतदानाची टक्केवारी शहरातील आतापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे. मतदान वाढल्यामुळे डिपॉजिट वाचविण्यासाठी लागणारी मते देखील वाढली आहेत. या मतदारसंघात 2009 साली तिरंगी आणि 2014 साली चौरंगी लढत पहावयास मिळाली होती. 2014 साली शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. परंतु सर्वाधिक मते घेऊन अपक्ष उमेदवार महेश लांडगे विजयी झाले होते. त्यावेळी महेश लांडगे यांना 27.19 टक्के, शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांना 20.27 टक्के, राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांना 19.98 टक्के तर भाजपच्या एकनाथ पवार यांना 19.72 टक्के मते मिळाली होती. या चारही उमेदवारांचे डिपॉजिट वाचले होते. यंदा 3,74, 424 मतदारांनी मतदान केले असून डिपॉजिट वाचविण्यासाठी 62154 मतांची गरज आहे. डिपॉजिट वाचविण्यासाठी लागतात किती मते? निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 अर्थात 16.6 टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. एकूण उमेदवारांपैकी जास्तीत जास्त केवळ 6 उमेदवार आपले डिपॉजिट वाचवू शकतात आणि ते ही जर पहिल्या सहाही उमेदवारांना सम-समान 16.66 टक्के मते पडली तर. शक्यतो असे होत नाही. शहरात आतापर्यंत झालेल्या तीनही मतदारसंघाची निवडणूक पाहिल्यास केवळ भोसरी मतदारसंघात 2014 साली पहिल्या चार उमेदवारांनी आपले डिपॉजिट वाचविले होते तर याच निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या तीन उमेदवारांनी डिपॉजिट वाचविले होते.