Genelia Dsouza:’मी किती नशीबवान आहे’… जेनेलिया डिसूजाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखचा खास संदेश

Genelia Dsouza: बॉलिवूड अभिनेत्री आणि रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया डिसूजा आज ५ ऑगस्ट रोजी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी रितेशने सोशल मीडियावर तिच्यासोबतच्या काही खास आणि कधीही न पाहिलेल्या फोटोंसह एक भावनिक पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. रितेशची ही पोस्ट पाहून चाहते आणि अनेक सेलेब्रिटीसुद्धा जेनेलियाला शुभेच्छा देत आहेत.
जेनेलियासाठी रितेशची खास पोस्ट
रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्रामवर जेनेलियासोबतच्या अनेक सुंदर आठवणी शेअर करत लिहिलं,
“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझी प्रिय बायको , माझं प्रेम. तुझा वाढदिवस मला सतत आठवण करून देतो की मी किती नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस.”
रितेशच्या नजरेतून जेनेलियाच्या खास गोष्टी
रितेशने आपल्या पोस्टमध्ये जेनेलियाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मांडले आहेत.
“तू एक विलक्षण व्यक्ती आहेस. तू मला हसवतेस, तू आमच्या मुलांची सर्वोत्कृष्ट आई आहेस, एक प्रेमळ मुलगी आहेस आणि एक खरी मैत्रीण आहेस. तू नेहमी इतरांसाठी वेळ आणि प्रेम राखतेस. तू आमच्या कुटुंबाची ताकद आहेस, अगदी थकल्यावरसुद्धा. तू ते प्रेम आहेस जे आपल्याला एकत्र बांधून ठेवतं.”
“तू माझा आधार आहेस”…
रितेशने पुढे लिहिलं,
“तू मला सतत चिडवतेस, मजा करतेस, माझ्या मित्रांपुढे माझे किस्से सांगतेस आणि मला लाजवत असतेस. पण हे सगळं मला खूप आवडतं. तू माझ्या प्रत्येक क्षणी सोबत असतेस, मला प्रोत्साहन देतेस आणि माझा सर्वात मोठा आधार आहेस. तू आमच्या घराचा जीव आहेस, आणि आपले दोन्ही मुलं तुझ्याकडे नेहमी आदराने पाहतात. आज मी फक्त एवढंच सांगू इच्छितो,तुला भरपूर आनंद, प्रेम आणि थोडासा आराम मिळावा, कारण तू हे सगळं कमावलं आहेस.”
“तू माझी प्रेरणा आहेस” – रितेशचा प्रेमळ संदेश
पोस्टच्या अखेरीस रितेशने लिहिलं,
“तू मला एक चांगला माणूस होण्यासाठी सतत प्रेरणा देतेस. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की तू माझ्या आयुष्यात आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!.”
रितेश आणि जेनेलियाचं नातं
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाचं लग्न ३ फेब्रुवारी २०१२ रोजी मराठी पद्धतीने पार पडलं. त्यांच्या लग्नात अनेक बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट २००२ मध्ये त्यांच्या डेब्यू चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ च्या सेटवर झाली होती आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली.





