कब तक छिपोगे गुवाहाटीमे ? संजय राऊत यांचा बंडखोरांना सूचक इशारा

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी पक्षाच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधणारे एक ट्विट पोस्ट केले, ज्यात त्यांनी म्हटले आहे की बंडखोर आमदार गुवाहाटीत किती दिवस लपून राहणार आहेत, त्यांना शेवटी मुंबईच्या चौपाटीवर यावेच लागणार आहे. या ट्विटवर त्यांनी विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटोही शेअर केला आहे.
झिरवाळ यांनी बंडखोरांपैकी 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे ट्विट केले आहे. बंडखोर आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी 27 जुनच्या सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तो पर्यंत ते आले नाहीत तर त्यांना थेट अपात्र ठरवण्याचा निर्णय घोषित केला जाऊ शकतो.
त्यामुळे बंडखोरांना आता अधिक काळ गुवाहाटीत लपून राहता येणार नाही असेच राऊत यांनी सुचवले आहे असे मानले जाते. तसेच राऊत यांनी या बंडखोरांना मुंबइच्या चौपाटीवर यावेच लागेल असे ज्या इराद्याने म्हटले आहे ते लक्षात घेता या आमदारांना मुंबईच्या भूमीत मोठ्या आव्हानात्मक स्थितीलाही सामोरे जावे लागू शकते असा सूचक इशाराही त्यांनी याद्वारे दिला आहे असे मानले जात आहे.





