Delhi Election : दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता संपला आहे. ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी जनतेशी संपर्क साधला. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 1.56 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
एक्झिट पोलवर किती काळ बंदी राहणार?
निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयानेही यासंदर्भात आदेश जारी केला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 22 जानेवारीच्या अधिसूचना क्रमांक 576/Exit/2025/SDR/Vol-1 कडे सर्वसामान्य जनतेचे, विशेषत: न्यूज ब्युरो, मीडिया हाऊस, रेडिओ आणि टेलिव्हिजन चॅनेल इत्यादींचे लक्ष वेधले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 2025 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, एक्झिट पोल, ओपिनियन पोल किंवा इतर कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे निकाल प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा इतर कोणत्याही पद्धतीने प्रकाशित करण्यावर बंदी असेल.
मतदानासाठी 13 हजार 766 मतदान केंद्रे
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 83.76 लाख पुरुष, 72.36 महिला आणि 1267 तृतीय लिंग मतदार आहेत. दिव्यांगांसाठी ७३३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
6980 लोकांनी घरबसल्या केले मतदान
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेअंतर्गत, 7553 पात्र मतदारांपैकी 6980 मतदारांनी आधीच मतदान केले आहे. घरबसल्या मतदानाची सुविधा २४ जानेवारीपासून सुरू झाली असून ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
आचारसंहिता भंगाचे 1000 हून अधिक गुन्हे दाखल
7 जानेवारी रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्या उल्लंघनाचे 1000 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. 33 हजार 434 जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत निमलष्करी दलाच्या 220 कंपन्या तैनात
निवडणूक आयोगाने पॅरा मिलिटरी फोर्सच्या 220 कंपन्या दिल्लीत तैनात केल्या आहेत. 19 हजार होमगार्ड आणि 35 हजार 626 दिल्ली पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.




