का? भारतातील आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय दैनिकांत मथळे

मुस्लिमविरोधी कायदा असल्याचे मत, खूप दिवसांनी भारतीय बातम्यांचा मथळा
मिथिलेश जोशी
नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले आहे. जगभरात मान्यता पावलेल्या अनेक नामवंत दैनिकांनी भारतातील या आंदोलनांना पहिल्या पानावर स्थान दिले आहे. वॉशिंग्टन पोस्ट, दि न्यूयॉर्क टाईम्स , दि वॉल स्ट्रिीट जर्नल्स, आणि दि गार्डियन या दैनिकांनी त्यांच्या पहिल्या पानावर या बातम्यांना स्थान दिले आहे. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरातून 370 कलम रद्द करण्याच्या बातमीचे मथळे बनले होते.
काही परदेशी नियतकालिकांनी का विरोधातील आंदोलनावर आपले मत मांडले आहे. त्यात हा कायदा मुस्लिमविरोधी आणि जातीयवादी असल्याचे म्हटले आहे. 17 डिसेंबरच्या अंकात लखनऊमधील दारूल उलून विद्यापीठाच्या बाहेर का विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाचे छायायचित्र आणि प्रवेशद्वाराबाहेर पोलिसांनी कारवाईसाठी सज्जता दाखवणारे छायाचित्र छापले आहे. त्याच अंकात पान 12 वर आंदोलन देशभर पसरत असल्याच्या वृत्ताच्या दोन बातम्या छापण्यात आल्या आहेत.
त्याच दिवशी न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर हेच छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. त्या बाबातमीचा मथळा मोदी यांनी हिंदृराष्ट्राकडे कटाक्ष टाकताच भारतात आंदोलने सुरू असा केला आहे. या बातमीत त्यांनी काश्मिरात शेकडो मुस्लिमांना ताब्यात घेतले असून ईशान्य भारतात सुमारे 20 लाख लोकांकडे नागरिकत्व नाही. त्यातील अनेक जण मुस्लिम आहेत. न्युयॉर्क टाईम्सने भारतात इंटरनेट सेवा खंडित करण्याच्या वृत्ताचा समावेश केला आहे. त्यात 60 लाख लोकांना म्हणजे जवळ जवळ फ्रान्सच्या आकाराएवढ्या लोकांची इंटरनेट सेवा बंद केली आहे. अन्य कोणत्याही देशापेक्षा ही संख्या अधिक आहे. न्युयॉर्क टाइम्सच्या अग्रलेखात या कायद्याची तुलना चीनमध्ये उईगर मुस्लिम आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या अटकेशी केली आहे.
वॉलस्ट्रिट जर्नलने पहिल्या पानावर भारताच्या नवा नागरित्व कायद्याविरोधात मुस्लिम निदर्शने पेटली, असा मथळा दिला आहे. या बातमीत या कायद्यातील जातीय उल्लेखाकाडे लक्ष वेधण्यात आले आहे. भारतीय निदर्शने : विद्यार्थ्यांकडून जंगली पोलिसांचा निषेध असा मथळा द गार्डियननने केला आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलानाची व्हिडिओ क्लिपही त्यांनी संकेत स्थळावर टाकली असून विद्यापीठातील ग्रथांलयात अश्रुधूर फोडण्यासारखी कठोर कारवाई केल्याकडे लक्ष वेधले आहे.
इस्रायलस्थित दि टाइम्स ऑप इस्रायलने मुस्लिम विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलनात भारतात सहा जणांचा मृत्यू असा मथळा दिलेला आहे. तर या आंदोलनाबाबत वायरने प्रकाशित केलेली विविध वृत्ते हझ्रीत्झने प्रकाशित केली आहेत. जिन्हुआ या चिनमधील वृत्त संस्थेने हेच वृत्त नव्या नागरिकत्व कायद्यामुळे दिल्लीत पुन्हा हिंसाचार अशा मथळ्याखाली छापला आहे.





