स्मृती मंधानाला कसा जोडीदार हवा? केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला खुलासा

Smriti Manthana: अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ या शोमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने (Smriti Manthana) हजेरी लावली होती. केबीसीच्या ‘उपलब्धियों का वर्ष’ या खास एपिसोडमध्ये स्मृतीसह भारतीय क्रिकेट टीमचा बॉलर इशान किशनसुद्धा हजेरी लावली होती. यावेळी तिने अमिताभ बच्चन यांच्यासमोर लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.
नॅशनल क्रश म्हणून ओळख असणाऱ्या स्मृतीला शोदरम्यान प्रेक्षकांमधील एका तरुणाने प्रश्न विचारला, “तुझे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. भारतातील बहुतांश तरुण मुलं तुला फॉलो करतात. तर मग मला असा प्रश्न विचारायचा आहे की, तुला एका मुलामधले कोणते गुण आवडतात?” हा प्रश्न ऐकताच सूत्रसंचालक बिग बी हसू लागतात आणि त्याला विचारतात, “तुझं लग्न झालं आहे का?” त्यावर तो तरुण म्हणतो, “नाही झालं, म्हणूनच हा प्रश्न विचारला आहे.”
या प्रश्नाचं उत्तर देताना स्मृती बोलते, “मी अशा प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. होय, मुलगा चांगला असावा, ही सर्वांत महत्त्वपूर्ण बाब आहे.” यापुढे ती काही म्हणण्याआधीच अमिताभ बच्चन तिला पुढचा प्रश्न विचारतात, “चांगला असावा म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय?” बिग बींच्या प्रश्नाचं उत्तर देत स्मृती म्हणते, “माझ्या मते तो काळजी घेणारा आणि माझ्या खेळाला समजणारा असावा. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे दोन गुण त्या व्यक्तीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण एक मी त्या व्यक्तीला खूप सारा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्याने माझी ही गोष्ट समजणं आणि काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
पुढे ती म्हणते, “माझ्या प्राधान्यक्रमात या दोन गोष्टी सर्वांत पहिल्या आहेत. या दोन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्या मी मुलामध्ये पाहते”, असेही स्मृतीनं सांगितलं. यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “एकूणच तुला सांगायचं आहे की, त्यानं तुझा आदर आणि सन्मान केला पाहिजे.” सध्या तिने केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
दरम्यान, स्मृतीने आतापर्यंत 6 टेस्ट, 80 वनडे आणि 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने अनुक्रमे 480, 3179 आणि 2998 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये तिची सरासरी 27.25 आणि स्ट्राइक रेट 122.46 इतकी आहे. तिने टेस्टमध्ये एक आणि वनडे सामन्यात आतापर्यंत पाच शतकं झळकावली आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 85 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या फलंदाजीच्या शैलीसह सौंदर्यामुळे देखील प्रसिद्ध आहे.





