तुम्हाला महिलांच्या भावना काय कळणार? रोहिणी खडसेंच्या टीकेला अजित पवार गटाने दिले प्रत्युत्तर

जळगाव : राज्यात सध्या लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यान आता लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली. तुमच्या 1500 रुपयांमध्ये सुख मिळणार आहे का? अशी टीका रोहिणी खडसेंनी केली. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार गटाचे रोहिणी खडसेंना जोरदार प्रत्युत्तर
लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी टीकास्त्र डागले आहे. 1500 रुपयांत काय होत? असे रोहिणी खडसे म्हणाल्या. त्यावर वैशाली नागवडे यांनी तुम्हाला काय कळणार महिलांच्या भावना. तुम्ही तर एकनाथ खडसे यांच्या कन्या आहात. राजकीय आशेनं तुम्ही बोलू लागल्या आहात. महिलांच्या लाभपेक्षा वैयक्तिक लाभाचा विचार करीत आहात. सरकारवर टीका केल्याशिवाय तुमची आमदारकी कशी फिक्स होणार? अशी टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे?
लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन् पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे. तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. यांना वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे.पण त्यांना महिला अद्याप समजल्याच नाहीत, अशी टीका रोहिणी खडसेंनी केली होती.





