वाल्मीक कराड आरोपी क्रमांक 1 कसा ठरला? ‘हा’ आहे महत्वाचा पुरावा

Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडी पोलिसांनी 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र केज कोर्टात दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कराडचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 असा करण्यात आला आहे. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून, संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा मेसेज वाल्मीक कराडने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय पुरता खोलात गेल्याचे मानले जात आहे.
पोलिसांनी वाल्मीक कराडला आरोपी ठरवताना वेगवेगळे पुरावे व व्हिडिओ क्लिपचा आधार घेतला आहे. या प्रकरणी संतोष देशमुखला होणाऱ्या मारहाणीचा व्हिडिओ व 5 गोपनीय साक्षीदारांची साक्षही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
पोलिसांनी आरोपपत्रात काय म्हंटले?
पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांची नांदूर फाट्यावर भेट झाली होती. या भेटीत 5 गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार सुदर्शन घुलेसोबत होता. याच भेटीत विष्णू चाटेने त्याला वाल्मीक कराडचा संदेश सांगितला. साक्षीदाराच्या जबाबानुसार, संतोष देशमुख आपल्या कामात आडवा आता तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा मेसेज अर्थात संदेश होता.
मारहाणीचा व्हिडिओही सीआयडीच्या हाती
संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओही सीआयडीच्या हाती लागला आहे. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करत असताना व्हिडिओ कॉल सुरू होता. या व्हिडिओ कॉलची क्लिप आरोपी जयराम चाटे याने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केली होती. हा डिजिटल पुरावा सीआयडीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचा दावा केला आहे. याच पुराव्याची मदत घेऊन सीआयडीने संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी होती, असा निष्कर्ष काढला आणि त्यानुसार वाल्मीक कराड हाच आरोपी क्रमांक 1 असल्याचे आरोपपत्रात नमूद केले. या आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे.
पोलिसांनी आरोपपत्रात आरोपींना क्रमांक दिले आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड पहिला क्रमांक, दुसरा विष्णू चाटे, त्यानंतर सुदर्शन घुले, प्रीतक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि आठवा फरार कृष्णा आंधळे असे क्रमांक दिले आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ 80 दिवसांतच चार्जशीट दाखल झाली. खरंतर मकोका अंतर्गत तपास यंत्रणेला गुन्हा दाखल झाल्यानंतर 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याची मुभा असते. या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदा दाखल झालेला खंडणीचा गुन्हा हा ॲट्रॉसिटीशी सुसंगत होता. ॲट्रॉसिटीचा मारहाणीशी आणि मारहाणीचा हत्येशी अशी गुन्ह्यांच्या साखळीचा मोठा उलगडा या आरोपपत्राद्वारे झाला आहे. हे 3 गुन्हे एकमेकांपासून वेगळे असते तर यासंबंधी 3 चार्जशीट दाखल झाले असते. पण आता सीआयडीने या तीनही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा असा आहे घटनाक्रम –
– 6 डिसेंबर 2024 रोजी अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले व इतर अनोळखी इसमांनी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला. त्यांनी सोनवणे नामक सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. यावेळी संतोष देशमुख यांच्याशी त्यांचा वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.
– 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून.
– सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा नोंद.
– 10 डिसेंबर रोजी जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक अटक.
-11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक.
-11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड, अजित पवार गटाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
-13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग.
-18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक.
– 19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या असून, त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली. अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार. नवनीत कॉवत यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती.
– 24 डिसेंबर रोजी आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग.
-31 डिसेंबर रोजी वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण. त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात हजर. 14 दिवसांची कोठडी.
– 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक. संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपपत्रात त्याला 8वा क्रमांक दिला आहे.





