“शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी कशी जाग आली? त्यांचे अनेक मंत्री..” ; ‘त्या’ टीकेवर अण्णा हजारेंचा सवाल

Anna Hazare on Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले आहे. आता सहाव्या टप्प्याचे मतदान येत्या २५ तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच आता राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, ते दोघेही आता कुठे दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी आण्णा हजारे यांच्यावर केली होती. दरम्यान, या टीकेला आता आण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“१०-१२ वर्षांनी कशी जाग आली?” Anna Hazare on Sharad Pawar ।
शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना अण्णा हजारे यांनी, “शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली”, असे म्हणाले आहेत.
तसेच पुढे त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि,“शरद पवार यांच्या पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती. मात्र, प्रत्येक पक्षात हे समविचारी माणसं असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच”, असे म्हटले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते? Anna Hazare on Sharad Pawar ।
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. ‘माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जी.आर. खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांची चौकशीही झाली होती. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे इतरांचे काय झाले? ते आज कुठे आहेत?”, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला होता.





