Nagar | नगर तालुक्यात ‘ड्रोन’ च्या घिरट्या

नारायणडोहो, (वार्ताहर) – नगर तालुक्यातील गुणवडी परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन नागरिकांच्या वस्त्यांवरती घिरट्या घालत आहे. रात्रीच्या अंधारात ड्रोन कशामुळे घिरट्या घालत आहे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
परिसरात रात्रीच्या वेळी अचानकपणे ड्रोन घिरट्या घालताना निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हे लोण नगर तालुक्यातही पसरले आहे.
तालुक्यातील गुणवडी परिसरात २ दिवसांपूर्वी रात्री आठ वाजता अचानकपणे अंधारात नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालताना नागरिकांच्या निदर्शनास आले. सुमारे चार ते पाच तासांपर्यंत रात्रीच्या वेळी गुणवडी ते मांडवगण रस्त्यावरील वस्त्या आणि गुणवडी ते रुई छत्तीशी रस्त्यावरील वस्त्यांवर ड्रोनच्या घिरट्या सुरूच होत्या.
सुरुवातीला नागरिकांनी ड्रोनकडे दुर्लक्ष केले. परंतु चार ते पाच तासापर्यंत ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
रात्री आठ वाजता व साडेनऊ वाजता गुणवडी ते मांडवगण रोड व रुईछत्तीशी रस्त्यावरील वस्त्यांवरील घरांवर अचानकपणे ड्रोन फिरू लागले. ड्रोन कोण उडवतय याचा नागरिकांनी शोध घेतला पण कोणीच दिसून आले नाही. ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. – महेंद्र शेळके, मा. उपसरपंच, गुणवडी

