Nagar | नगर तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

नगर (प्रतिनिधी) – गेल्या ८ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तातडीने पिक नुकसान भरपाईचे पंचनामे न केल्यास तहसील कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामरगावचे माजी सरपंच वसंतराव ठोकळ व सरपंच तुकाराम कातोरे यांनी दिला आहे.
नगर तालुक्यातील कामरगाव, चास, पिंपळगाव कौंडा येथील संततधार पाऊस झाल्याने मूग, बाजरी, तूर, सोयाबीन, कांद्यांचे रोप, शेवंती, झेंडू आदी पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
चास मंडळाअंतर्गत ६५ मिली मीटर पावसाची नोंद असून तहसील कार्यालयाकडून कृषी विभागाला नुकसान भरपाई पंचनामे करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले नाही. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांनी केली आहे.
काढणीला आलेला मूग, सडलेले सोयाबीन, भुईसपाट झालेली बाजरी, करपलेला झेंडू, उभाळलेली शेवंती असे विदारक चित्र परिसरातील गावात निर्माण झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
सुमारे १०० हेक्टर शेतजमीनिची पिके बाधित झाली असून झालेल्या पिक नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी माजी सरपंच वसंतराव ठोकळ, सरपंच तुकाराम कातोरे, प्रकाश कातोरे, शरद दळवी, राजकुमार दळवी, रमेश पाचरे, गोरख कोल्हे, सुरेश ठोकळ आदींनी केली आहे.
सध्या ज्वारी पेरणीसाठी शेतकऱ्यांना शेतीची मशागत करायची आहे. पंचनामे न झाल्यास ज्वारीचे पिक घेणे अवघड जाणार आहे. शासनाने याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जलद गतीने पंचनामे करावेत, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
याबाबत चास मंडळाधिकारी रुपाली टेमक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कामगार तलाठी हर्षद कर्पे यांना शिवार फेरी करून बाधित क्षेत्राचा सर्व्हे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.





