कैरो : संयुक्त राष्ट्रांचे तब्बल दोन डझन कर्मचाऱ्यांना येमेनमधील इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांनी पकडले आहे. येमेनची राजधानी सनामध्ये हौथींनी संयुक्त राष्ट्रांच्या आणखी एका ठिकाणावर छापा घालून या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांना राजधानी सनाच्या नैऋत्येकडील हडा येथील केंद्रातून ताब्यात घेतले गेले आहे, असे येमेनमधील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयकांचे प्रवक्ते जीएन आलम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांमधघ्ये येमेनचे ५ आणि १५ आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बंडखोरांनी अन्य ११ कर्मचाऱ्यांना चौकशी केल्यानंतर सोडून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्राकडून हौथींशी आणि अन्य संबंधितांशी संपर्क साधला गेला असून सर्व कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका केली जाण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच सना येथील संयुक्त राष्ट्राच्या केंद्रावर पुन्हा पुर्ण नियंत्रण मिळवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत, असेही आलम यांनी सांगितले. बंडखोरांनी या केंद्रातील फोन, सर्व्हर आणि संगणक यासारखी सर्व संवाद उपकरणे ताब्यात घेतली आहेत हौथींनी ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्ल्ड फूड प्रोग्रॅम, युनिसेफ आणि ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशनऑफ ह्युमनेटेरियन अफेअर्ससारख्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हौथींकडून संयुक्त राष्ट्राच्या एजन्सींविरोधात दीर्घकाळापासून धडक कारवाई केली जाते आहे. विशेषतः राजधानी सना, किनारपट्टीजवळील होदेदा आणि उत्तर येमेनमधील सदा भागात अशी कारवाई केली जात असते.