Deool Band 2 : बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट देऊळ बंद २ आज (२१ मे) राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या देऊळ बंद या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. या चित्रपटात बदलत्या काळात शेतकऱ्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या संकटांवर भाष्य करत आत्महत्यांऐवजी शेतीत बदल आणि नव्या विचारांची गरज असल्याचा संदेश देण्यात आला आहे. (Deool Band 2 ) ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची दैवी भूमिका चित्रपटात साकारली आहे. तर अभिनेत्री स्नेहल तरडे महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. स्वामी समर्थ आणि एका संघर्ष करणाऱ्या महिला शेतकऱ्याचा प्रवास चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. शेती, दऱ्याखोऱ्या आणि एसटी प्रवासाच्या दृश्यांमधून ग्रामीण वास्तव अधोरेखित करण्यात आले आहे. ‘देऊळ बंद’च्या पहिल्या भागात अभिनेता गश्मिर महाजनी मुख्य भूमिकेत होता. एका अहंकारी आणि नास्तिक नासा शास्त्रज्ञाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर श्रद्धा आणि संस्कृतीविषयी त्याच्या विचारांमध्ये घडणारा बदल हा चित्रपटाचा मुख्य गाभा होता. या कथेत स्वामी समर्थ मानवी रूपात येऊन त्याचे आयुष्य बदलताना दाखवले गेले होते. (Deool Band 2) देऊळ बंद २ मध्ये प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भुतकर, सुनील अभ्यंकर आणि संस्कृती बालगुडे यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आज २१ मे रोजी पहिल्या दिवशी देऊळ बंद २ हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर किती कलेक्शन करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घालत आहे. हेही वाचा : Karan Kundrra Tejasswi Prakash Engagement: तेजस्वीसाठी करणचा खास प्रपोजल प्लॅन; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल