हॉटेल्सना 10.45 ची डेडलाइन

पुणे- शहरातील करोनाची लाट ओसरली असली, तरी करोना अजून संपलेला नाही, त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला शहरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच रात्री 10.45 पर्यंतच सुरू राहणार आहेत. तसेच ऑनलाइन फूड डिलीव्हरीसाठी हीच वेळ असणार आहे.
या बाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी काढले आहेत. तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी बाहेर न पडता घरीच स्वागत करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
शहरात दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांकडून मोठया प्रमाणात रस्त्यांवर गर्दी केली जाते. तसेच या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये जातात. दरम्यान, शहरात करोनाच्या बाधितांचा आकडा घटला असला, तरी अद्याप धोका टळलेला नाही.
त्यातच, रस्त्यांवर पुन्हा गर्दी झाल्यास या साथीचा प्रसार वाढण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट तसेच घरपोच फूड डिलिव्हरीची सेवा रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय, 10 वर्षाच्या आतील मुले तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक यांना बाहेर पडण्यास मनाई असणार असून या शिवाय, या दिवशी नागरिकांनी धार्मिक स्थळी गर्दी करू नये, तसेच रात्रीच्या वेळी आतिषबाजी करू नये असेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.





