पिंपरी | हॉटेल्स, चायनीज दुकाने यांची नित्यनेमाने तपासणी व्हावी

नाणे मावळ, (वार्ताहर) – समाधानकारक पाऊस होत असल्याने मावळ तालुक्यात पावसाळी पर्यटनाला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत असून सर्वच वयोगटातील नागरिक मावळात पर्यटनासाठी येताना दिसतात.
अशात वर्षा विहाराचा आनंद घेत असताना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टपऱ्यांमधील गरमागरम भजी, वडापाव, समोसे आदी पदार्थ खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. परंतु अशा टपऱ्या, मिठाईची दुकाने, हॉटेल्स, चायनीज सेंटर आदी ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या सुचना आणि नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही.
तालुक्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटकांना चांगले अन्न, पदार्थ मिळाले पाहिजेत, ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. सुरक्षित पर्यटनासोबत आरोग्यदायी पर्यटन होणे देखील आवश्यक आहे. परंतु तालुक्यात पर्यटनस्थळी किंवा बाजारपेठा असणाऱ्या ठिकाणी काही हॉटेल्स, टपऱ्या, छोटी-मोठी चायनीज दुकाने ही स्वच्छतेच्या बाबतीत अगदी शून्य असून अन्न बनविताना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुचनाही पाळताना दिसत नाहीत.
एकतर पावसाळ्यात वातावरणात होणारे बदल, परिसरातील अस्वच्छता यामुळे डास, विषाणू यांचा प्रादुर्भाव सहजरित्या होतो. त्यातून आजारपण उद्भवते. सोबत दुषित पाण्यामुळेही विविध आजार होतात. त्यामुळे पर्यटक किंवा नागरिक घराबाहेर पडल्यावर जिथे चार घास खातात, त्या जागा सतत तपासणे गरजेचे आहे.
मावळ तालुक्यात कामशेत, टाकवे बु., लोणावळा, पवनानगर, सोमाटणे, तळेगाव, वडगाव या मोठमोठ्या बाजारपेठा आहेत. सोबत अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी असणारे हॉटेल्स, टपऱ्या, चायनीज दुकाने आदी खाद्यपदार्थ विक्री करणारी ठिकाणे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नित्यनेमाने तपासणी होताना दिसत नाही. तसे होत असते तर अस्वच्छता, दर्जाहीन तेल पदार्थ वापरणे, अव्वाच्या सव्वा दर लावणे यांसारखे प्रकार दिसले नसते, अशी तक्रार नागरिक पर्यटक करत आहेत.
अनेक हॉटेल्समध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष –
मावळ तालुक्यात जशी पर्यटनस्थळे आहेत, तसाच मुंबई पुणे महामार्गही आहे. त्यामुळे तालुक्यात हॉटेल्सची संख्या मोठी आहे. तालुक्यात अनेक नामांकित हॉटेल्स आहेत. परंतु हॉटेल्स आणि त्यात असणारे कीचन यांची स्वच्छता व तिथे नियमांचे पालन होते की नाही, यावर संबंधित विभाग नित्यनेमाने लक्ष ठेवताना दिसत नाही.
अनेक हॉटेल्समध्ये स्वच्छता नावालाही नसते. धुळ बसलेले टेबल्स, माशांचा थवा असणारे किचन असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. त्यावर ठोस कारवाई पण होत नाही, त्यामुळे पर्यटक आणि नागरिक यांच्या जीवाशी खेळ होतोय, अशी तक्रार नागरिक करत आहेत.
उघड्यावरील अथवा अस्वच्छ ठिकाणचे खाद्य पदार्थ खाल्ल्यास पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप असे आजार सहजरित्या होतात. त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी अन्न न खाणे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती उद्योजक योगेश माझिरे यांनी दिली.
पावसाळ्यात बाजारपेठा तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे. उघड्यावरील आणि अस्वच्छ ठिकाणी बनविलेले पदार्थ हे आरोग्यास हानिकारक असतात, अशी प्रतिक्रिया नवनाथ नाणेकर यांनी दिली.





