Doctors protest: उद्या हॉस्पिटल्स बंद; राज्यातील डॉक्टरांचा संप
Doctors protest: ... तर महाराष्ट्रातील आयएमएसह विविध संघटनांचे डॉक्टर 9 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार

Doctors protest: राज्यातील डॉक्टरांनी उद्या एक दिवसाच्या सामूहिक संपाची हाक दिली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयाच्या डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आयएमए’ने (इंडियन मेडिकल असोसिएशन) सोमवारी राज्यभरातील आरोग्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात ओपीडी सेवा देखील ठप्प राहणार असून मात्र रुग्णांसाठी आपत्कालीन सेवा, प्रसूती सेवा जीवनावश्यक उपचार सुरू ठेवण्यात येणार आहेत. परंतु यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच म्हणणं आहे की, डोंबिवलीत डॉक्टर आणि परिचारिकांवर केलेला हल्ला हा डॉक्टरांच्या व्यवस्थेवर केलेला हा हल्ला आहे. तेव्हा अशा हिंसाग्रस्त वातावरणात रुग्णसेवा देणे कठीण असल्याने अशाप्रकारच्या हल्लेखोरांवर शासनाने कठोर कारवाई करावी.
अशी प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने तातडीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप दूर करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी 6 ते मंगळवारी सकाळी 6 या वेळेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
अन्यथा बेमुदत संपावर जाणार…
आयएमएच्या विविध मागण्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतले नाही तर महाराष्ट्रातील आयएमएसह विविध संघटनांचे डॉक्टर 9 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जातील, असा इशारा ‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई, राज्य खजिनदार डॉ. अमोल गिते यांनी दिला आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडे मागण्या –
- डोंबिवली घटनेतील दोषी आरोपींवर तात्काळ आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- ‘महाराष्ट्र मेडिकेअर कायदा’ अधिक कडक आणि प्रभावी करण्यात यावा, जेणेकरून डॉक्टरांवर हात उचलण्यास कोणीही धजावणार नाही.
- राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये २४ तास सुरक्षा व्यवस्था तैनात करणे बंधनकारक करावे.
- डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराविरुद्ध सरकारने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण लागू करावे.
- डॉक्टरांना रुग्णालयात कोणत्याही भीतीशिवाय आणि सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी.
हेही वाचा:





