Bhiwandi Building Collapses : इमारत कोसळून भीषण दुर्घटना; 3 जणांचा दुर्दैवी अंतर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Bhiwandi Building Collapses : गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सदर इमारत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली.

Bhiwandi Building Collapses : भिवंडीतील भंडारी कंपाउंड परिसरातील गंगाराम वाडी येथे असलेल्या कोहिनूर अपार्टमेंटच्या बी विंगचा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून मलब्याखाली आणखी किमान पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
NDRF आणि TDRF ची पथके युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सदर इमारत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली.
सुमारे १४ ते १५ वर्षे जुनी असलेल्या या चारमजली इमारतीत ३२ कुटुंबे वास्तव्यास होती. सदर इमारत धोकादायक घोषित केल्यानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. त्यानंतर इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामादरम्यान एकाच वेळी तीन खांब (पिलर) तोडण्यात येत असताना इमारतीचा तोल गेला आणि ती अचानक कोसळली. दुर्घटना घडताच अनेक रहिवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेत जीव वाचवला. मात्र काही जण मलब्याखाली अडकले. दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी लोखंडी सळ्या कापून मलब्यातून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी IGM रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढलेल्या व्यक्तींमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. बाहेर आल्यानंतर तिने सांगितले की, दुर्घटना घडली तेव्हा तिचे आई-वडील कसेबसे बाहेर पडले, मात्र ती स्वतः मलब्याखाली अडकली होती. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मलब्याखाली आणखी पाचपेक्षा जास्त जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने रेस्क्यू टीम अत्यंत सावधगिरीने शोध आणि बचाव मोहीम राबवत आहे.
बांधकामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह
कोहिनूर अपार्टमेंटचे बांधकाम २०१२ मध्ये करण्यात आले होते. या इमारतीच्या प्रकल्पाचे असिसमेंट २००७ मध्ये झाले होते. इमारतीत दोन विंग्स होत्या. मात्र, बांधकामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कमकुवत बांधकामामुळे ही इमारत धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने तिला धोकादायक इमारत म्हणून घोषित केले होते.





