Pune News : पुण्यात भीषण अपघात; बस थांब्यावरील विद्यार्थ्यांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू
Pune News : बोपदेव घाटाकडून येवलेवाडी येथे येणाऱ्या रस्त्यावर भरधाव टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटून बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बस थांब्यावर चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.

Pune News : बोपदेव घाटाकडून येवलेवाडी येथे येणाऱ्या रस्त्यावर भरधाव टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटून बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बस थांब्यावर चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. (Pune News)
विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी अशी त्या दोघांची नावे आहेत. सिद्धेश राजे याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे दोघे जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास बोपदेव घाटाकडून येवलेवाडीच्या दिशेने भरधाव वेगात टेम्पो येत होता. येवलेवाडीकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बसथांब्याजवळ २० ते २५ विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत होते. (Pune News)
बस थांब्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर वाहतूक संथ झाली होती. त्या वेळी टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने सर्वप्रथम पुढे जाणाऱ्या कारला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित टेम्पो थेट बस थांब्याच्या दिशेने गेला आणि तेथे थांबलेल्या विद्यार्थ्यांना धडकला. (Pune News)
या भीषण धडकेत पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने भारती हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक (वानवडी), इनामदार हॉस्पिटल (कोंढवा) आणि ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर एकाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. (Pune News)
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, परिसरात शांतता असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली. (Pune News)




