Rajgurunagar : पोस्टमनच्या पुतळ्यातून टपाल सेवेचा गौरव
Rajgurunagar : या सोहळ्याच्या निमित्ताने राजगुरुनगर उपडाकघरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा, विशेषतः पोस्टमन कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

राजगुरुनगर : हातात पत्रांचे गठ्ठे, खांद्यावर टपालाची पिशवी आणि ऊन-पावसाची तमा न बाळगता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचणारा पोस्टमन म्हणजे केवळ पत्रांचा वाहक नव्हे, तर माणसांच्या भावना, नाती आणि विश्वास जोडणारा महत्त्वाचा दुवा! अशा या पोस्टमनच्या निष्ठावान सेवेला सन्मानित करण्यासाठी खेड तालुक्यातील भारत माता व्यासपीठाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत राजगुरुनगर उपडाकघरात पोस्टमनच्या पुतळ्याची उभारणी केली. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा खेड उपविभागाचे डाक निरीक्षक राहुल जाधव यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
टपाल विभागाची सेवा ही केवळ पत्रे पोहोचविण्यापुरती मर्यादित नसून, ती समाजातील माणसांना एकमेकांशी जोडणारी विश्वासाची परंपरा आहे. पूर्वीच्या काळात दूरवर असलेल्या नातेवाइकांची खुशाली, आनंदाची बातमी, नोकरीचे नियुक्तिपत्र, परीक्षेचा निकाल किंवा एखादा महत्त्वाचा सरकारी संदेश घराघरांत पोहोचविण्याचे काम पोस्टमनने अत्यंत जबाबदारीने केले. बदलत्या काळात मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल संदेशवहनाची साधने आली, तरी टपाल विभागाचे महत्त्व कमी झालेले नाही.
या सोहळ्याच्या निमित्ताने राजगुरुनगर उपडाकघरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा, विशेषतः पोस्टमन कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. टपाल विभागात प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या माजी पोस्टमन कर्मचाऱ्यांनाही आवर्जून निमंत्रित करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे जनसेवेसाठी समर्पित करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत जुन्या आणि नव्या पिढीतील टपाल कर्मचाऱ्यांमधील सेवाभावाचा अनुबंध अधिक दृढ करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन राजगुरुनगर उपडाकघराचे पोस्टमास्तर दत्तात्रय कोकणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाकपाल सुकांती सोमवंशी यांनी केले. या उपक्रमासाठी भारत माता व्यासपीठाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले. यावेळी डाक निरीक्षक सागर जोशी, डाक आवेशक विशाल कोकतरे, सागर गुरव, साक्षी साबळे, तेजश्री हुंडारे, पोस्टमन दिनेश खटावकर, निवृत्त पोस्टमन प्रभाकर जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोस्टमनच्या कार्याला सामाजिक प्रतिष्ठा देणारा उपक्रम…
पोस्टमनच्या पुतळ्याची उभारणी हा केवळ स्मारक उभारण्याचा उपक्रम नसून, निष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचा गौरव करणारा प्रयत्न आहे. प्रत्येक पत्रामागे कोणाची तरी भावना, अपेक्षा किंवा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण दडलेला असतो. ही भावना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम पोस्टमन प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे त्याच्या कार्याचा सन्मान म्हणजे समाजाच्या विश्वासाचा सन्मान होय.





