पुणे जिल्हा | पहिल्या तीन आदर्श गणेश मंडळांचा सन्मान

ओतूर, (वार्ताहर) – पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करणार्या पहिल्या तीन आदर्श गणेश मंडळांचा सन्मान करण्यात येणार असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
नियुक्त केलेल्या समिती सदस्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी केले आहे.
ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गणेशोत्सव मंडळात गणेशोत्सव कालावधीत शिस्तबध्द समाजोपयोगी व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, श्रींच्या मूर्तीचे राखण्यात आलेले पावित्र्य, मंडळ परिसरातील स्वच्छता,
समाज प्रबोधनात्मक आदर्श देखावे, सर्व धर्म सम भावाचे पालन, मंडळाचे वतीने नेमण्यात आलेली सुरक्षा समिती, शिस्तबद्ध मिरवणूक, नियमांचे व कायद्यांचे पालन करून विहित वेळेतच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात यावे.
जाणीवपूर्वक पारंपरिक वाद्यांचा केलेला वापर, डिजे, डॉल्बीच्या कायद्याने 50 डेसिबल आवाजाची पाळलेली मर्यादा या आणि अशा सर्व मुद्द्यांवर आधारित ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव मंडळाचे अवलोकन करण्याकामी तसेच त्यांच्या विशेष सामाजिक कार्यासाठी 100 पैकी गुण देऊन प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी मंडळांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांच्या निवड समितीची नियुक्ती करण्यात आली असून या समितीतील पत्रकार बापू रसाळे,
डॉ. संजय वेताळ, अॅड. संजय शेटे, सेवानिवृत्त कक्ष अधिकारी दिलीप घोलप, माजी शिक्षण विस्तार अधिकारी रत्ना शिरसाठ, माजी केंद्रप्रमुख मारुती जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
प्रथम तीन क्रमांकात येणार्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या हस्ते तसेच पुणे येथे आयोजित कार्यक्रमात विशेष पारितोषिक वितरण करून सन्मानित करण्यात येणार आहे, असे थाटे यांनी नमूद केले आहे.





