Hong Kong Sixes 2024 : युएईनं केला मोठा उलटफेर, भारताचा अवघ्या 1 धावेनं केला पराभव…

Hong Kong International Sixes (India vs UAE) : हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेत टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. पाकिस्तानपाठोपाठ दुबळ्या यूएईनेही टीम इंडियाचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे. यासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
UAE ने भारताचा एका धावेने पराभव केला आहे. प्रथम खेळताना UAE ने 6 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्या होत्या. म्हणजेच या ‘करो या मरो’ सामन्यात भारताला विजयासाठी 36 चेंडूत 131 धावा करायच्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 129 धावा करता आल्या. यापूर्वी पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत आता टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
यूएईचा सलामीवीर खालिद शाहने 10 चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांसह 42 धावांची खेळी केली. तर अखेरीस जहूर खानने 11 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांसह 37 धावा केल्या. त्यामुळे यूएई संघ सहा षटकात 130 धावसंख्येपर्यत मजल मारू शकला. यादरम्यान भारताकडून स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक तीन बळी घेतले.
131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून भरत चिपलीने 6 चेंडूत तीन षटकारांसह 20 धावा केल्या. याशिवाय कर्णधार रॉबिन उथप्पाने 10 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह 43 धावांची खेळी खेळली. तर स्टुअर्ट बिन्नीने 11 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह 44 धावांची खेळी खेळली पण तीही व्यर्थ गेली.कारण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
Hong Kong Sixes 2024 : टीम इंडियाचा दारूण पराभव, पाकची विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक…
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 32 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी तीन धावांची गरज असताना बिन्नी एक धाव घेऊन धावबाद झाला. त्यामुळे भारत 6 षटकात 3 गडी गमावून 129 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला आणि संघाला एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले.





