Honeytrap Case : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारी ‘ती’ महिला अखेर गजाआड; सोनई पोलिसांची मोठी कारवाई
Honeytrap Case : व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी.

Honeytrap Case – मुळा कारखाना शाळेजवळ रहिवाशी असलेली सेवानिवृत्त कर्मचारी यांना श्रीरामपूर येथील महिलेने व ब्राह्मणी येथील साक्षीदारांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी सेवानिवृत्त इसमाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या समोर कथन केला होता.
सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सोनई पोलिसांनी दोन तासात चार आरोपींना अटक केली होती. यातील महिला पसार होती. तिला सोनई पोलिसांनी अटक केली. अटकेतील चौघा आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सोनई येथील सेवानिवृत्त कर्मचारी यांनी २७ फेब्रुवारी रोजी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मोबाईलवर मेसेज करून अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी श्रीरामपूर येथील महिलेसह ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील चार व्यक्तींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ ब्राह्मणी येथील चार आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवार २ मार्च रोजी सोनई पोलिसांनी हनीट्रॅपमधील महिलेला ताब्यात घेतले. महिलेचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.या महिलेसह सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.





