Honda cars: होंडा कार जानेवारीपासून वाहनांच्या किमती 2% पर्यंत वाढवणार

मुंबई – एकूण महागाई वाढली आहे. वाहतुकीचा खर्च वाढला आहे. रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. अशा परिस्थितीत गेल्या एक महिन्यापासून विविध वाहन कंपन्यांनी दरवाढ जाहीर करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
होंडा कार्स या कंपनीने आज आपल्या विविध वाहनांच्या दरात दोन टक्क्यापर्यंत वाढ जाहीर केली. जानेवारपासून ही दरवाढ लागू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. विविध वाहनांच्या दरात वेगवेगळ्या प्रमाणात वाढ केली जाणार असल्याचे संकेत या कंपनीने दिले आहेत. होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष कुणाल बहेल यांनी सांगितले की, एकूण परिस्थिती पाहता आम्ही शक्य तितक्या कमी प्रमाणात दरवाढ करण्याचा प्रयत्न केला आहे.
याच कारणामुळे देशातील बहुतांश वाहन उत्पादकांनी या अगोदरच दरवाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. ज्या कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या दरात वाढ केली आहे. त्यामध्ये भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीचा समावेश आहे.
त्याचबरोबर ह्युंदाई, टाटा मोटर्स या कंपन्यांनीही आपल्या वाहनांच्या दरात एक जानेवारीपासून वाढ जाहीर केली आहे. एक वर्षापासून वाहन कंपन्यांच्या विक्रीत जास्त व्याजदरामुळे फारशी वाढ झालेली नाही. यामुळे आतापर्यंत या कंपन्या दरवाढ करणे टाळत होत्या. मात्र महागाई इतकी जास्त आहे की, आता दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.




