Homemade Cookies: कुकीज म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण बाजारातील कुकीज रोज खाणं आरोग्यासाठी आणि खिशासाठी दोन्हींसाठी चांगलं नसतं. त्यामुळे अनेक जणी घरच्या घरी कुकीज बनवण्याचा विचार करतात. मात्र, ओव्हन किंवा मायक्रोवेव नसल्यामुळे अनेकदा हा विचार मागे पडतो. आता काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही अगदी साध्या गॅसच्या चुलीवर आणि कढईतही बाजारासारख्या कुरकुरीत आणि चविष्ट कुकीज सहज बनवू शकता. ही पद्धत सोपी असून घरात उपलब्ध साहित्य वापरून कुकीज तयार होतात. लागणारे साहित्य १ कप मैदा अर्धा कप मऊ लोणी अर्धा कप पिठीसाखर अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर काही थेंब व्हॅनिला इसेन्स आवडीप्रमाणे चॉकलेट चिप्स किंवा सुका मेवा Homemade Cookies कृती स्टेप १: एका भांड्यात लोणी आणि पिठीसाखर एकत्र घ्या. ते हलके आणि क्रीमी होईपर्यंत चांगले फेटून घ्या. स्टेप २: त्यात व्हॅनिला इसेन्स घालून हलकेच मिसळा. स्टेप ३: आता मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घाला. सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पीठ तयार करा. स्टेप ४: तयार पिठाचे छोटे गोळे करून हाताने थोडे चपटे दाबा. हवे असल्यास वरून चॉकलेट चिप्स किंवा सुका मेवा लावा. स्टेप ५: जाड तळाची कढई घ्या. तिच्या तळाशी मीठाची जाड परत पसरवा आणि त्यावर एक स्टँड ठेवा. ५ मिनिटे कढई झाकून प्रीहीट करा. स्टेप ६: एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये कुकीज ठेवा आणि ती कढईतील स्टँडवर ठेवा. झाकण लावून मंद आचेवर २० ते २५ मिनिटे शिजू द्या. स्टेप ७: कुकीज बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्या आपोआप कुरकुरीत होतील. घरच्या घरी तयार केलेल्या या कुकीज ताज्या, चविष्ट आणि अधिक सुरक्षित असतात. मुलांच्या डब्यासाठी, पाहुण्यांसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ओव्हन नसला तरीही तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट कुकीज बनवू शकता.