गृहमंत्र्यांकडून आजीबाईंना साडीचोळीचा मान

डोंबारी खेळातून परिस्थितीशी लढतीची दखल घेत केली एक लाखाची मदत
हडपसर (प्रतिनिधी) – हडपसरमध्ये रस्त्याकडेला डोंबारी खेळातून काठी-दांडपट्ट्याचा खेळ करणाऱ्या 85 वर्षांच्या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचे खूप कौतुक होत असताना मदतीचे हातही पुढे आले. अभिनेता रितेश देशमुख यांच्या मदतीनंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कसरतपटू आजी शांता बाळू पवार यांची गोसावीवस्ती येथे भेट घेत साडीचोळीसह एक लाख रुपयांची मदत दिली. तसेच पुणे पोलिसांचा भरोसा सेल व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी आजींना सांगितले.
हडपसर गोसावीवस्ती येथील डोंबारी खेळ करणाऱ्या शांताबाई बाळू पवार (वय 85) यांचा दांडपट्टा खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ देश-विदेशात व्हायरल झाला असून, त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेकांनी त्यांच्या नातवांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
याबाबत शांताबाई पवार सांगतात की, मी दहा अनाथ मुलांची जबाबदारी मोठ्या हिमतीने सांभाळत आहे. माझा नातू बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याची फी भरता न आल्याने त्याचे पुढील शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत मला होती. शांताबाईंनी वयाच्या नवव्या वर्षापासून डोंबारी खेळ करायला सुरुवात केली. लग्न होईपर्यंत आई-वडिलांसोबत त्यांनी खूप ठिकाणी डोंबारी खेळ केले. लग्नानंतर त्यांनी खेळ करणे बंद केले. मात्र, काही दिवसातच पतीचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी शांताबाईंवर आली. त्यातूनच पुन्हा त्यांनी डोंबारी खेळ सुरू केला. त्या जागोजागी साहसी खेळांची प्रात्यक्षिक सादर करून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवीत आहेत. उतारवयात देखील त्या शहरात व विविध गावात खेळ सादर करत आहेत.शांताबाई केवळ दुसरी शिकलेल्या आहेत. त्या लेझीम आणि दांडपट्टा, असे खेळही सादर करतात. आत्मविश्वास आणि ऊर्जा असेल, तर आयुष्यात आपण खूप काही करू शकतो, हे शांताबाईंचा जीवन प्रवासातून समजते.
दैनिक “प्रभात ऑनलाइन’चाही सहभाग…
शांताबाई पवार यांचा खेळाचा व्हिडिओ डिजिटल प्रभातनेही व्हायरल केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मदतकार्य करण्यासाठी इच्छा व्यक्त करून पवार यांच्या बॅंक खात्याची माहिती मागितली होती त्याला प्रभातच्या प्रतिनिधीने पवार यांच्या बॅंक खात्याची माहितीही साइटवर उपलब्ध करून दिल्याने पवार आजींना मिळण्यास सोपे झाले आहे.




