करोनामुळे होळी बाजाराचा ‘बेरंग’

दरवर्षीच्या तुलनेत यंदा शुकशुकाट
चिनी मालाऐवजी भारतीय वस्तू बाजारपेठांमध्ये उपलब्ध
पुणे – उत्साहाचा सण असणारी होळी आणि धुलिवंदन सर्व वयोगटांतील नागरिक साजरी करतात. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या होळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा शुकशुकाटच होता. देशभरातील होळीवर यावर्षी करोनाची भीती पसरल्याने नागरिकांमध्ये उत्साह नसल्याचे विक्रेते सांगतात.
होळीसाठी आवश्यक असणाऱ्या गोवऱ्यांच्या बरोबरीने बच्चेकंपनीसाठी विशेष आकर्षण असणाऱ्या पिचकाऱ्या, रंग, ढोलकी, टिमकी बाजारात दाखल झाली आहेत. हे साहित्य खरेदी करण्यासाठी सुट्टीचे निमित्त साधून मंडई, रविवार पेठ आदी शहरांतील मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरांमध्ये नागरिकांची रेलचेल होती.
मात्र, दुसरीकडे चीनमधून येणाऱ्या वस्तूंची आवक न झाल्याने नागरिकांना नेहमी असणारे विविध प्रकार उपलब्ध न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. परंतु, यंदा चिनी मालाऐवजी भारतीय वस्तू बाजारपेठांमध्ये उपलब्ध असून, त्यांना चांगलीच मागणी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये काही अंशी समाधानाचे वातावरण आहे.
ही घ्यावी खबरदारी
– होळीमध्ये जळाऊ पदार्थ न वापरता लहान होळी करावी
– होळी मोकळ्या पटांगणात पेटविण्यात यावी
– झोपडपट्टी तसेच आगीच्या दृष्टीने संवेदनशिल भागात लहान होळी करावी
– छप्पर असलेल्या, विजेच्या तारांच्या खाली होळी करू नये
– होळीमध्ये फटाके टाकू नयेत
– दुर्घटना टाळण्यासाठी होळी करताना पाण्याचे भरलेले पिंप व बादल्या जवळ ठेवाव्यात.
होळीसाठी खबरदारी घ्या…
शहरात होळी साजरी करताना ती पर्यावरणपूरक आणि सुरक्षित करण्याचे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून करण्यात आले. सण साजरा करताना दक्षता घेऊन कोणत्याही दुर्घटनेविना सुरक्षितपणे तो साजरा करण्याचे आवाहन महापालिकेचे अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी केली आहे. सण साजरा करताना अनेकदा अतिउत्सामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने सर्वांनी खबरदारी घ्यावी तसेच लहान मुलांना होळीपासून दूर ठेवण्याचे आवाहन अग्निशमनदलाने केले आहे.





