पिंपरी | तळेगावमध्ये होळी, धुलीवंदन उत्साहात साजरे

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव शहर आणि परिसरात होळी आणि धुलीवंदन सण उत्साहात साजरे करण्यात आले. यावर्षी आबालवृद्धांच्या सहभागाने उत्सवात मोठीच रंगत आली होती.
रविवारी सायंकाळी घरोघरी होळी पेटविण्यात आली. तर काही सार्वजनिक मंडळांनी सार्वजनिक होळी साजरी केली. सायंकाळी सहा वाजल्यानंतर विधिवत होळीचे पूजन केले. गोवऱ्या, लाकडे टाकून होळी पेटविण्यात आली. त्यानंतर आबालवृद्ध, महिला व तरूणाईने होळी भोवती गोल फेरा मारून पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला.
सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून लहान मुले, तरुण हातात रंग घेऊन धुलीवंदन उत्साहात साजरा करीत होती. शाळांना सुट्ट्या असल्याने मुलांमध्ये मोठा उत्साह होता. ओल्या आणि कोरड्या रंगाच्या यावेळी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
काही हाऊसिंग सोसायटीमध्ये डीजे लावला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत हा उत्साह कायम होता. लोकसभेसाठी आचारसंहिता असल्याने राजकीय कार्यकर्ते ,नागरिक, मुलांचा तरुणांचा सहभाग या वर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.





