Rohit Sharma : माहीच्या निवृत्तीने हिटमॅनही भावुक! रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…
Rohit Sharma : धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून भावनिक पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

Rohit Sharma : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. आयपीएल 2027 च्या रिटेन्शन डेडलाइनच्या दिवशी धोनीने हा मोठा निर्णय घेतला.
धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून भावनिक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. अशातच भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा यालाही धोनीच्या निवृत्तीने भावुक केले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर धोनीसोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहित शर्माने पोस्टमध्ये काय म्हटलं?
रोहित शर्माने धोनीच्या आयपीएलमधील शानदार कारकिर्दीचे कौतुक केले आहे. पोस्टमध्ये तो म्हणाला, “धोनी भाई, तुमच्या अविश्वसनीय आयपीएल कारकिर्दीबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. अनेक वर्षांपासून तुमच्यासोबत मैदानावर वेळ घालवण्याची आणि अनेक आठवणी निर्माण करण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. तुमच्याबद्दल मनापासून आदर.”
Congratulations on an incredible IPL career, Dhoni bhai. It’s been fun sharing the field and so many memories with you over the years. Much respect! https://t.co/EI4KqVRavv
— Rohit Sharma (@ImRo45) November 18, 2026
निवृत्तीनंतर धोनीची नवी जबाबदारी काय?
खेळाडू म्हणून आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी चेन्नई सुपर किंग्जसोबत जोडलेला राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तो संघाचा ‘टीम मेंटर’ म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती आहे. पोटरी आणि गुडघ्याच्या दुखापतींच्या समस्येमुळे धोनीने अखेर आयपीएलमध्ये खेळण्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी कशी राहिली?
महेंद्रसिंग धोनीची आयपीएल कारकीर्द अत्यंत शानदार राहिली आहे. त्याने 278 सामन्यांमध्ये 38.30 च्या सरासरीने एकूण 5,439 धावा केल्या आहेत. यामध्ये 24 अर्धशतके आणि 264 षटकारांचा समावेश आहे.
कर्णधार म्हणून धोनीने 235 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले. त्यापैकी 136 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 अशा पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
Javed Akhtar : ‘धर्म कोणताही असो, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे’; जावेद अख्तर यांचं वक्तव्य






