महानाट्यातून उलगडला इतिहास

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -स्वत:ची आणि कुटुंबाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या क्रांतिकारकांचा धगधगता इतिहास “उनकी याद करे’ या महानाट्यातून उलगडत गेला आणि उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या मनात देशभक्ती चेतविली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
महानाट्याचे उद्घाटन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “डीईएस’चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, दिग्पाल लांजेकर आदी उपस्थित होते.
रॅंडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंचा पराक्रम, लोकमान्य टिळक आणि शि. म. परांजपे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली विदेशी कपड्यांची होळी, ब्रिटिशांचे कर्दनकाळ मदनलाल धिंग्रा यांनी केलेली कर्झन वायलीची हत्या, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निर्माण झालेला असंतोष, शहीद भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान आणि सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना व त्यांचे ऐतिहासिक भाषण असे अंगावर रोमांच उभे करणारे स्वातंत्र्य चळवळीतील निवडक प्रसंग दृक-श्राव्य माध्यमांतून सादर करण्यात आले.
विविध ठिकाणी शोभायात्रा
“डीईएस’च्या वतीने शहराच्या विविध भागांतून शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून हातात तिरंगी झेंडे घेऊन भारतमातेचा जयघोष करीत सहभागी झाले होते. स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी विशेष आकर्षण होते.





