ऐतिहासिक कामगिरी! पीएमपीच्या वाहकाचा तिकीट विक्रीचा विक्रम…

एकाच शिफ्टमध्ये विकली 20 हजारांची तिकिटे
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वाहकाने रविवारी एकाच शिफ्टमध्ये तब्बल 20 हजाराची तिकीट विक्री करण्याचा विक्रम नोंदवला आहे. रविवारी निगडी ते लोणावळा (369) या मार्गावर सुखदेव बाजीराव जाधव या वाहकाने एका शिफ्टमध्ये तब्बल वीस हजार रूपयांची तिकीट विक्री केली. ही पीएमपीच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट विक्री आहे.
पीएमपीच्या ग्रामीण भागात अनेक मार्गांवर बस सुरू आहेत. पण, लोणावळा ते निगडी हा मार्ग सर्वाधिक गर्दीचा आहे. पीएमपीच्या या मार्गावर सध्या 7 बस धावत आहेत. या बसच्या माध्यमातून दररोज 14 फेऱ्या होतात. या मार्गावर एका शिफ्टमध्ये दररोज साधारण 12 ते 14 हजार रूपयांची रक्कम जमा होते. पण, रविवारी पुणे ते लोणावळा लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली होती.
प्रशासनाने या मार्गावर सात अधिक गाड्या सोडल्या होत्या. पीएमपीला याचा आर्थिक फायदा झाला असून पीएमपीचे या मार्गावरील उत्पन्न वाढले. सुखदेव जाधव या वाहकाने या मार्गावरील जास्तीत जास्त प्रवाशांना घेवून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामगीरीची दखल पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
या मार्गावर एमआयडीसी, एकवीरा देवी मंदिर आणि वॉटर पार्क आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी या मार्गावर गर्दी असते. पण, रविवारी लोकल सेवा बंद होती त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रवाशांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतकी तिकीट विक्री झाली.
-सुखदेव जाधव, वाहक.





