हिंजवडी – महापारेषणच्या इन्फोसिस ते पेगासस २२० केव्ही अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत रविवारी (दि. ६) दुपारी मोठा बिघाड झाल्याने माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई आणि आयटी हबमधील सहा गावे अंधारात गेली आहेत. या बिघाडामुळे महावितरणच्या ९१ उच्चदाब ग्राहकांसह १२ हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, २४ तास उलटूनही अनेक भाग अंधारातच आहेत. यामध्ये आयटी पार्क, एमआयडीसी, डॉहलर कंपनी, रायसोनी पार्क आणि विप्रो सर्कल परिसराचा समावेश आहे. महापारेषणकडून रविवारी सकाळी नियोजित देखभाल दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत करताना दुपारी २.१० च्या सुमारास भूमिगत वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे २२ केव्हीच्या २५ वाहिन्याही ठप्प झाल्या. महावितरणकडून पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, तब्बल ६३ मेगावॅटहून अधिक भार दुसऱ्या वाहिन्यांमार्गे वळविण्यात येत आहे. दरम्यान, पिण्याचे व वापराचे पाणी बंद असल्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.