Hingoli Ganesh Utsav 2024 : ईडोळीमध्ये विद्यार्थ्यासह गावकऱ्यांचा पुढाकार, घेतला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प…

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील इडोळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या. याच गणेशमूर्तीची घरी स्थापना करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतला आहे. हिंगोली तालुक्यातील इडोळी येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळा घेतली.
यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, चित्रकार दिलीप दारव्हेकर, मुख्याध्यापक आत्माराम जाधव, अशोक देवकर, राजेश्वर पवार, उपसरंपच रामेश्वर टेकाळे, विठ्ठल जाधव, अंकुश पवार यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेसाठी मुंबईच्या एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशनकडून शाडू माती पुरविण्यात आली. यावेळी चित्रकार दारव्हेकर यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक व उपस्थित गावकऱ्यांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार सर्वांनीच गणेशमूर्ती तयार केल्या.
दिलीप दारव्हेकर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकही देण्यात आले.





