Hingoli News : धोतरा येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या धोत्रा गावातील जिल्हा परिषद शाळेत केवळ एकच शिक्षक असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी ११ वाजता शाळेला कुलूप ठोकले. या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ४० विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र एकमेव शिक्षकामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
ग्रामस्थांनी जोपर्यंत शाळेत पुरेसे शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत शाळा उघडू न देण्याची आक्रमक भूमिका घेतली. शालेय समिती अध्यक्ष नागनाथ तायडे, नानाभाऊ थिटे, राम थिटे, संतोष तुकाराम ढोणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले. यापूर्वीही वारंवार मागणी करूनही शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला होता.
साखरा येथील केंद्रप्रमुख जी. एन. पायघन यांनी मध्यस्थी करत तात्पुरत्या स्वरूपात एक शिक्षक पाठवण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आणि शाळेचे कुलूप उघडण्यात आले. मात्र, ग्रामस्थांनी शिक्षकांच्या कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी कायम ठेवली आहे.





