Hingoli News : हिंगोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्क तुटला
Updated On:

हिंगोली: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. २६) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
आज सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला, ज्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. सेनगाव तालुक्यातील भंडारी गावाजवळील ओढ्याला पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली.
यामुळे हिवरखेडा, धोत्रा, भंडारी, होलगीरा येथील महाकाली विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुली, ज्या महामंडळाच्या बसने ये-जा करतात, त्या पुरात अडकल्या. पावसामुळे बस अडकल्याने वाहतूक ठप्प झाली आणि सुमारे नऊ ते दहा गावांचा संपर्क तुटला. शेतकऱ्यांनाही शेतात अडकून पडावे लागले. पूर ओसरल्यानंतर या मुली घरी परतणार आहेत.





