Hingoli : वीज आणि पाण्यासाठी हिवरखेडा ग्रामस्थ आक्रमक; महावितरण कार्यालयावर महिलांची धडक!
Hingoli : हिवरखेडा गावात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठाही ठप्प झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची व्यथा निवेदनात मांडण्यात आली आहे.

Hingoli : सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी बुधवारी महावितरणच्या सेनगाव कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हिवरखेडा गावात गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठाही ठप्प झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची व्यथा निवेदनात मांडण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घोरदरी येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरून हिवरखेडा व घोरदरीसाठी स्वतंत्र फिडर होता. मात्र, गेल्या काही दिवसांत केलसुला, खडकी व बोरखेडी ही गावेही या फिडरला जोडण्यात आल्याने अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी हिवरखेडा गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून तो सुरळीत राहत नसल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच, वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक वीज खांब वाकले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय घोरदरी ३३ केव्ही लाईनवरून हिवरखेड्यासाठी नव्याने वीजजोडणी करण्यात आली असली, तरी संबंधित कंत्राटदाराने नवीन खांब व लाईन उभारूनही आवश्यक रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे विद्यमान रोहित्रावर अतिरिक्त भार पडून वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित कंत्राटदाराच्या कामाची चौकशी करून आवश्यक रोहित्र तात्काळ बसवावे व गावातील वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा महिला व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा करून सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी सरपंच पूजा अमोल मस्के, पोलीस पाटील रूपाली केशव मगर, वैशाली मंठेकर, कावेरी दत्तराव निरगुडे, रुक्मिणाबाई पांडुरंग निरगुडे, अमोल मस्के, अश्रुजी क्षीरसागर, सावता मगर, गणेश चव्हाण, रामेश्वर देसाई, शिवराम फुपाटे, प्रकाश वाकळे, सुभाष फुपाटे, पत्रकार शिवशंकर निरगुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





