हिंगोली जिल्हा ग्रामपंचायत निकाल : 10 वर्षे सरपंच राहिलेल्या सुनेचा सासूकडून पराभव

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – आतापर्यंत प्रत्यक्षात आपण सासू सुनेची भांडणे ही चुलीपर्यंत मर्यादित असल्याची बघितली आहेत. परंतु, या पलीकडेही जाऊन हिंगोली मधील एका सासू सुनेचे भांडण चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात पोहोचले होते. सासू एका पॅनल कडून तर सून एका पॅनल कडून परस्पर विरोधी उभे ठाकल्याने मतदार चांगले संभ्रमात पडले होते. या दोघी सासू सुनेचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला होता. मात्र सुनेला सासू वरचढ भरल्या आहेत. तब्बल 571 मते घेऊन सत्ता सासू बाईच्या हाती गेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायतची निवडणुक सासू-सूनेच्या उमेदवारीने चांगलीच चर्चेत आली होती. या निवडणुकीकडे अवघ्या हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज झालेल्या मतमोजणीमध्ये शोभाबाई धामणकर यांनी सरपंचपदासाठी 571मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी त्यांच्या सून संगिता धामणकर यांचा पराभव केला आहे.
सेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी 5 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये शोभाबाई धामणकर तर त्यांच्या विरुध्द त्यांची सून संगिता धामणकर यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे निवडणुकीचा प्रचारदेखील त्यांनी सोबतच केला. त्यामुळे सरपंचपदासाठी कोण बाजी मारणार?, याची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आज सासू बाई च्या हाती सत्ता गेली आहे.
पराभूत झालेल्या सूनबाई मागील 10 वर्षे सरपंच –
विशेष म्हणजे आज पराभूत झालेल्या संगिता धामणकर यांनी यापूर्वी 10 वर्षे सरपंचपद भुषवले आहे. यावेळीही त्यांनी सरपंचपदासाठी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधातच नवख्या असलेल्या त्यांच्या सासू शोभाबाई धामणकर निवडणुक रिंगणात उतरल्या होत्या. या शिवाय कोमल काळे, शारदा काळे यांनी देखील सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते.
571 मतांनी विजयी –
दरम्यान, गावात सरपंच पदासोबतच सदस्य पदाचा प्रचार शिगेला पोहोचला होता. यामध्ये राजकारणात 10 वर्षे सरपंच असलेल्या संगिता बाजी मारणार का नवख्या असलेल्या त्यांच्या सासू शोभाबाई बाजी मारणार, याकडे स्थानिक नागरिकांसोबतच जिल्ह्यातील नागरीकांचे लक्ष लागले होते. आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली. यामध्ये सरपंचपदासाठी असलेल्या शोभाबाई धामणकर यांनी 571मते घेऊन विजय मिळविला. तर त्यांच्या सूनबाई संगिता धामणकर यांना 263 मते मिळाली. कोमल काळे यांना 474 तर शारदा काळे यांना 17 मते मिळाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या निवडणुकीत सासू वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची आकडेवारी –
1)सरपंच – शोभाबाई श्रीरंग धामणकर 571
2)कोमल राजेश काळे 474
3)विठ्ठल शंकर काळे 297
4)संगीता सुभाष धामणकर 263
5)शारदा संतोष काळे 17





