हिंगोली: नर्सी नामदेव येथे परतवारी एकादशीनिमित्त दर्शनासाठी लाखावर भाविक; परिसरातील वातावरण भक्तीमय

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे परतवारी निमित्त बुधवारी (ता. 31) भाविकांची पहाटेपासूनच दर्शनाला सुरवात झाली. दिवसभर भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. परतवारीसाठी आलेल्या भाविकांसाठी 50 क्विंटल साबुदाना खिचडी, दिड लाख राजगिरा लाडू वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात लाखावर भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे गेल्यानंतर कामिका एकादशीला संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे दर्शन घेतल्या शिवाय वारी पूर्ण होत नाही अशी परिसरात अख्यायिका आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासात दिंड्या नर्सीत दखल होतात. यालाच परतवारी म्हणून संबोधले जाते. मागील आठ दिवसांपासून संस्थानच्या वतीने परतवारीची जय्यत तयारी सुरु करण्यात आली होती. वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला तर एलईडी स्क्रिनवर दर्शनाची व्यवस्थाही करण्यात आली.
नर्सी नामदेव येथे आज पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरु झाली. पावसाळी वातावरण व भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तीन वाजल्यापासूनच दर्शन सुरु करण्यात आले. त्यानंतर सकाळी सहा वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे, ओमप्रकाश हेडा, भिकाजी कदम, भिकुलाल बाहेती यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी भिकाजी किर्तनकार, मनोज आखरे, ब्रिजमोहन तोष्णीवाल, गणेश मगर, द्वारकादास सारडा यांची उपस्थिती होती.
महापूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी भल्या पहाटेपासूनच वारकरी भाविक हे शेकडो पायदळ दिंड्या समवेत खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती टाळ, मृदंग व मुखी विठूनामाचा गजर करीत नामदेवांच्या दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसरातील वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. त्यामुळे अवघी पंढरी नर्सी येथे अवतरल्याचे चित्र दिसून आले. आषाढी एकादशीच्या वारीला जे भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात ते भाविक मात्र परतवारी एकादशीला संत नामदेवाचे दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात, हे विशेष आहे. त्यामुळे ठिकठिकाणावरुन भाविक मिळेल त्या वाहनाने येथे दाखल होतात. पहाटे पासूनच भाविकांनी मंदिर परिसरात नामदेवाच्या दर्शनासाठी रांगा लावून मोठी गर्दी केली होती.
दर्शनासाठी लांबच लांब वाहनांच्या रांगा –
परतवारी एकादशीला संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असल्याने हिंगोली-सेनगाव रोडवर तीन किलोमीटर अंतरावर दुतर्फा भाविकांच्या वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था करण्यात आली होती. लांब रांगा लागल्या. त्यामुळे रोडवर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त –
दरम्यान, परतवारी निमित्त पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, नर्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. के. सानप यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शिवाय संस्थानच्या वतीने स्वयंसेवक महिला-पुरुषांची ठिकठिकाणी नियुक्ती केली होती. भाविकांच्या पादत्राणासाठी मंदिर परिसरात काळकोंडी येथील शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने मोफत व्यवस्था करण्यात आली होती.





