Hingoli News : भाविकांनी भरलेल्या बसला आग; औंढा नागनाथ – वसमत मार्गावरील घटना

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ ते वसमत मार्गावरील वगरवाडी शिवारात सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास भाविकांना घेऊन जाणारी एक प्रवासी बस भररस्त्यात पेटली. या बसमधून तब्बल 40 भाविक प्रवास करत होते. पण सुदैवाने त्यातील कुणीही जखमी झाले नाही. ते सर्वजण सुखरुप आहेत. पण त्यांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीने महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना केले आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून एक बस सुमारे 40 भाविकांना घेऊन औंढा नागनाथच्या दिशेने येत होती. सदर बसमध्ये भाविकांसह त्यांच्यासाठी भोजन तयार करण्याचे साहित्यही होते. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सदर बस वसमतकडून औंढा नागनाथकडे येत होती. यावेळी वगरवाडी शिवारात बसच्या पाठीमागील भागातून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे चालकाने तातडीने बस थांबवून भाविकांना खाली उतरविले. यावेळी परिसरातील नागरीक त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी वाहनातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले व काही साहित्यही बाहेर काढले. दरम्यान, बघता – बघता आगीने रौद्ररुप धारण केले. त्यानंतर नगर पंचायतीचे अग्नीशमनदल घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्याचे काम सुरु अद्याप सुरू आहे.
बस कोल्हापूर जिल्ह्यातील
सदर खाजगी बस कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सुत्रांनी सांगितले. कर्नाटक येथून रविवारी ता. ६ दुपारी भाविक निघाले होते. त्यानंतर आज हा प्रकार घडला आहे. बसमधील वायरींगमुळे आग लागली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.





