Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील ऐतिहासिक तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जमिनीखाली एक प्राचीन भुयार आढळून आले आहे. या घटनेमुळे शहरात उत्सुकता आणि तर्कवितर्कांना उधाण आले असून नागरिकांची मोठी गर्दी तलाव परिसरात जमली आहे. कसे सापडले भुयार? तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वसमतचा हा तलाव फुटला होता. त्यात शहराचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असून सध्या काम प्रगतिपथावर आहे. गुरुवारी संरक्षण भिंतीसाठी जेसीबीने खोदकाम सुरू असताना जमिनीखाली दगड आणि चुन्याने बांधलेले एक मजबूत भुयार उघड झाले. खोदकामात या भुयाराचा काही भाग क्षतिग्रस्त झाला असला तरी उर्वरित बांधकाम पाहून हा जुन्या काळातील स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असल्याचे जाणकारांचे मत आहे. गुप्तधनाच्या चर्चेला उधाण – वसमत शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्याने हे भुयार नेमके कुठे जाते, ते तत्कालीन पाणीपुरवठा यंत्रणेचा भाग आहे की युद्धकाळातील गुप्त मार्ग आहे, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. या भुयारात गुप्तधन असल्याचीही चर्चा जोर धरत आहे. ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरताच भुयार पाहण्यासाठी नागरिकांनी तलाव परिसरात एकच गर्दी केली. पुरातत्त्व विभागाची तपासणी आवश्यक – हे भुयार नेमके कोणत्या काळातील आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, हे पुरातत्त्व विभागाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. तोपर्यंत या भुयाराची सुरक्षा राखणे आणि दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असेल. माजी नगराध्यक्ष खलील अहमद सौदागर यांनी या भुयारावर तज्ञांनी प्रकाश टाकणे गरजेचे असल्याचे सांगितले.