ट्रम्प यांची मोठी कारवाई, 104 भारतीयांना परत मायदेशी पाठवले; बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना घेऊन निघालेले विमान अमृतसरमध्ये दाखल

US Deports Indian Migrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या भारतीय नागरिकांना घेऊन निघालेले विमान देशात दाखल झाले आहे. या विमानात एकूण 104 भारतीय प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन सैन्याचे C-17 हरक्युलिस विमान या प्रवाशांना घेऊन पंजाबच्या अमृतसर येथे दाखल झाले. या विमानाने मंगळावारी सॅन अँटोनियो (अमेरिका) वरून अमृतसरसाठी उड्डाण घेतले होते.
अमेरिकेतून उड्डाण घेतलेल्या विमानात 104 भारतीय प्रवासी आहेत. 13 मुले, 79 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. यापैकी 33 जण गुजरातमधील असून त्यांना थेट विमानतळावरून गुजरातला पाठवले जाईल. या विमानात क्रू मेंबर आणि अमेरिकन अधिकारी देखील होते, जे भारतीय प्रवाशांना अमृतसर विमानतळावर सोडून परत जाणार आहेत.
अमृतसरला पोहोचलेल्या या विमानातील बहुतांश लोक पंजाबचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हे नागरिक डंकी रूट किंवा इतर मार्गाने अमेरिकेत पोहोचले होते, परंतु त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती.
अमेरिकेने भारतासह ब्राझील, मेक्सिको आणि इतर अनेक देशांतून आलेल्या बेकायदेशीर प्रवाशांनाही परत मायदेशी पाठवले आहे. तसेच, ज्यांच्या नागरिकत्वाची खात्री होत नाहीये, अशांना तुरुंगात देखील ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरित्या राहत असलेल्यांना परत पाठवणार असल्याचे वारंवार म्हटले आहे. इमिग्रेशन एंड कस्टम्स इन्फोर्समेंटने अशा 15 लाख प्रवाशांची यादी देखील तयार केली होती. यामध्ये 18 हजार भारतीयांचा समावेश आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर 11 दिवसातच 25 हजार बेकायदेशीरपणे देशात राहत असलेल्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये जवळपास 1700 भारतीयांचा देखील समावेश होता.





